तिरूवनंतपुरम् - केरळ उच्च न्यायालयाने एका 13 वर्षीय बलात्कार पीडितेचा गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे. 26 आठवड्यांची गर्भवती असलेल्या या मुलीचा 24 तासात गर्भपात करावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या विशेष याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
या अगोदर उच्च न्यायालयाने एका आरोग्य पथकाची नियुक्ती केली होती. मुलीची आरोग्य तपासणी करून गर्भपात करणे कितपत शक्य आहे, याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. गर्भपात करणे थोडे जिकरीचे असले तरी ते शक्य आहे, असा अहवाल आरोग्य पथकाने दिला आहे. त्यामुळे न्यायालयाने गर्भपातास मान्यता दिली.
कायद्याने फक्त 24 आठवड्यांचा गर्भपात करण्याची परवानगी आहे. या घटनेमध्ये गर्भ 26 आठवड्यांचा आहे. मात्र, माता अल्पवयीन असून बलात्कार पीडित आहे, ही बाब लक्षात घेऊन न्यायालयाने गर्भपाताला मान्यता दिली आहे. पीडित मुलीवर तिच्या 14वर्षीय भावाने लैंगित अत्याचार केला होता.