जबलपूर : उच्च न्यायालयात नोकरी लावण्याच्या आमिषाने 15 बेरोजगारांना लाखो रुपयाचा चुना लावणाऱ्या भामट्याला जबलपूर उच्च न्यायालयाने तब्बल 110 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. या अनोख्या शिक्षेमुळे मध्य प्रदेशात चांगलीच चर्चा रंगत असून भामट्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. पुरुषोत्तम पासी असे त्या न्यायालयाने 110 वर्षाची शिक्षा ठोठावलेल्या भामट्याचे नाव आहे. त्याला जबलपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभिषेक सक्सेना यांनी ही शिक्षा ठोठावली आहे. पुरुषोत्तम पासी याने उच्च न्यायालयात नोकरी लावण्याच्या आमिषाने 15 जणांची फसवणूक केली आहे.
उच्च न्यायालयात नोकरीच्या नावाने भामटेगिरी : जबलपूरमधील बिल्हारी गावच्या पुरुषोत्तम पासी याने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात नोकरी लावण्याचे आमिष बेरोजगारांना दिले होते. उच्च न्यायालयात नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुरुषोत्तमने 15 बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळले होते. आपण उच्च न्यायालयात मोठ्या पदावर कार्यरत असल्याचेही तो बेरोजगार तरुणांना सांगत असे. त्यामुळे त्याला अनेक बेरोजगारांनी नोकरीसाठी पैसे दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
असे फुटले उच्च न्यायालयातील नियुक्तीपत्रांचे बिंग : आरोपी पुरुषोत्तमने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात नोकरी लावण्यासाठी 15 बेरोजगारांकडून पैसे उकळले. मात्र या बेरोजगारांनी नोकरीचा तगादा लावल्यानंतर पुरुषोत्तमने त्यांना नियुक्तीपत्रेही वाटप केली होती. यासाठी पुरुषोत्तमने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा बनावट शिक्का बनवला होता. त्या शिक्क्याचा वापर करुन त्याने नियुक्तीपत्रेही वाटप केली होती. उच्च न्यायालयात ही नियुक्तीपत्रे घेऊन 15 उमेदवार गेले होते. मात्र उच्च न्यायालयाने अशी कोणतीही नियुक्तीपत्रे जारी केले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही नियुक्तीपत्रे बनावट असल्याचे बिंग फुटल्याने एकच खळबळ उडाली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या भामट्याचे बिंग फुटल्यानंतर उमेदवारांनी पोलिसांकडे धाव घेतली. उमेदवारांनी जबलपूर पोलिसांना भामट्याविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे पोलिसांनी पुरुषोत्तमच्या मुसक्या आवळून त्याला जेरबंद केले होते.
न्यायालयाने ठोठावली 110 वर्षाची शिक्षा : जबलपूर पोलिसांनी पुरुषोत्तमच्या मुसक्या आवळून त्याला न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयात पुरुषोत्तमविरोधात भादंवी कलम 420 अन्वये 15 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी 5 वर्षाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभिषेक सक्सेना यांनी ठोठावली. 15 जणांची फसवणूक प्रकरणी एकूण 75 वर्षाची शिक्षा त्याला ठोठावण्यात आली. त्यासह मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा बनावट शिक्का बनवल्यामुळे त्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभिषेक सक्सेना यांनी दोषी ठरवले. याप्रकरणी पुरुषोत्तम पासीला 35 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. पुरुषोत्तमची ही एकत्रित शिक्षा 110 वर्षे होत आहे.