अहमदाबाद : चंद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर आज सॉफ्ट लँडींग करणार आहे. मात्र नुकतचं रशियाचं लुना 25 यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर क्रॅश झाल्यानं रशियाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेकडं जगाचं लक्ष लागलं. जर आज इस्रोला चंद्रयान 3 मोहिमेत अपयश आलंच तर मग काय, असा सवाल करोडो भारतीयांना पडला आहे. मात्र त्यावरही इस्रोच्या संशोधकांनी उपाय योजला आहे. जर आज चंद्रयान 3 मोहिमेत काही अडथळा आला, तर इस्रोच्या संशोधकांचा 'प्लॅन बी' तयार असल्याची माहिती अहमदाबाद येथील इस्रो सेंटरचे संचालक निलेश देसाई यांनी दिली.
पुन्हा करणार लँडींगचा प्रयत्न : इस्रोचे शास्त्रज्ञ विक्रम लँडरचं यशस्वी लँडींग करण्यासाठी मोठी कसरत करत आहेत. मात्र काही तांत्रिक अडचण आलीच तर संशोधकांनी आपला 'प्लॅन बी' तयार ठेवला आहे. इस्रोचे अहमदाबाद येथील संचालक निलेश देसाई यांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली. लँडींग नियोजितपणे होईल, मात्र लँडींगमध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास पुन्हा 27 ऑगस्टला लँडींग करण्यात येईल, अशी माहिती निलेश देसाई यांनी दिली.
दोन तासापूर्वी करणार कमांड अपलोड : विक्रम लँडरचं आज दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडींग होणार आहे. मात्र काही तांत्रिक अडचण आली, तर इस्रोच्या संशोधकांनी आपला बी प्लॅन तयार ठेवल्याचं निलेश देसाई यांनी स्पष्ट केलं. विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडींग सायंकाळी 05.47 वाजता सुरू होईल, त्याला 17 मिनिटं आणि 21 सेकंद लागणार आहेत. मात्र लँडींगच्या दोन तास अगोदर आम्ही कमांड अपलोड करू अशी माहिती निलेश देसाई यांनी दिली. आम्ही लँडरमधील इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल प्रणालीच्या टेलीमेट्रीचं विश्लेषण करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यानंतर प्रणाली अनुकूल आहे किंवा नाही, याची तपासणी केली जाईल, असंही इस्रोचे शास्त्रज्ञ निलेश देसाई यांनी सांगितलं. आज लँडींग झालं नाही, तर 27 ऑगस्टला आम्ही 17 किमीवरुन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरु असंही निलेश देसाई यांनी यावेळी सांगितलं आहे.
हेही वाचा -