बंगळुरू - कर्नाटकचा उत्तर भाग हा विविध प्रकारच्या भाकऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील महिला भाकऱ्या बनवून मिळणाऱ्या उत्पन्नावर समाधानी आहेत. ही गोष्ट आहे एका महिलेची, जिच्या निर्णयानं अनेक महिलांचं जीवन बदलून गेलंय.
रिकामा खिसा आणि भुकेलं पोट माणसाला बरंच काही शिकवून जातं. या म्हणीला साजेसं ठरणारं उदाहरण म्हणजे या महिलेचं जीवन. भाकऱ्या करणाऱ्या महादेवी यांचे भाकरीनेच जीवन बदलून टाकले. विशेष म्हणजे अनेक महिलांना त्यांनी जगण्याचं साधन दिलंय. महादेवी या कर्नाटकातील कलबुर्गीच्या रहिवासी आहेत. लग्नानंतर फार कमी वेळातच त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांना आपल्या दोन मुलांसोबत जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. बर्याच संकटांना सामोरे गेल्यानंतर आत्महत्या करून त्यांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी मुगलखोडमधील एका सद्धगृहस्थाने त्यांना धैर्य दिले आणि रोजी-रोटीसाठी भाकरी विकण्याचा सल्ला दिला. महादेवी म्हणतात की, त्या सद्धगृहस्थाच्या आशीर्वादाने आता २०० हून अधिक स्त्रिया त्यांच्याबरोबर भाकऱ्या बनवून स्वतंत्रपणे आपले जीवन जगतायत.
केवळ तीन रुपयांना भाकरी
हे काम गेल्या 32 वर्षांपासून करत आहे. जोलेग अप्पोरांच्या आशीर्वादाने मी हे सुरू केले. सध्या येथे 150 ते 200 लोक काम करत आहेत, असे महादेवी म्हणाल्या. त्यांच्या स्वयंपाक घरात आज महिला हजारो भाकऱ्या, चपाती, धपाटी, होलीज तयार होतात. जिल्ह्याच्या इतर भागात भाकरीची किंमत जवळपास १०-१२ रुपये असते. मात्र, महादेवी केवळ तीन रुपयांना त्यांच्या भाकरी विकतात. महादेवी हे काम एक सेवा म्हणूनही करत आहेत. शिवाय ज्या लोकांकडे खायलासुद्धा पैसे नाहीत, अशांना त्या मोफत भाकरी देतात. महादेवींना असे वाटते की, कोणीही कधी उपाशी राहू नये.
इतर राज्यातही मागणी
महादेवी विद्यार्थ्यांना तर १ ते २ रुपयांमध्ये भाकरी देतात. एखाद्या माणसाला शहरातील कोणत्याही हॉटेलमध्ये जेवण्यासाठी 60 ते 70 रुपये द्यावे लागतात. मात्र, महादेवींकडून भाकरी विकत घेतली तर त्याला 20 रुपयात पोटभर जेवण मिळू शकते. येथील भाकऱ्या केवळ कलबुर्गीमध्येच प्रसिद्ध नसून त्यांना इतर राज्यातही मागणी आहे. परदेशातील नागरिकसुद्धा ही भाकरी खरेदी करतात आणि सोबत घेऊनही जातात.
मालकीण बाई सर्वांशी खूप चांगल्या पद्धतीने वागतात
येथे सुमारे 200 कर्मचारी कार्यरत आहेत. आमच्या मालकीण बाई सर्वांशी खूप चांगल्या पद्धतीने वागतात. ही नोकरी मिळाल्यानंतर मी माझ्या कुटुंबाचा गाडा सन्मानपूर्वक चालवण्यास सक्षम झाले. या नोकरीमुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहोत, असे महादेवींच्या स्वयंपाक घरातील एक कामगार महिला म्हणाली. काही वर्षांपूर्वी महादेवींनी नैराश्येतून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र त्यांनी स्वत:ची कंपनी तयार केली असून 200 हून अधिक महिलांना त्यांनी नोकरी मिळवून दिलीय.