चेन्नई - आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथून तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीला जाताना इंडिगो एअरलाईन्सच्या सहवैमानिकाला (कॉकपीट क्रू) सौम्य हृदयविकाराचा झटका आला. विमान लँडिंग होण्याच्या काही काळ आधी ही घटना घडली. मात्र, या कर्मचाऱ्याचे प्राण थोडक्यात वाचले. इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
विमानाचे पुढील उड्डान रद्द
विमान खाली उतरत असताना कॉकपीटमधील कर्मचाऱ्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर या कर्मचाऱ्यास विमान खाली उतरल्यानंतर तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कर्मचाऱ्याची आता अँजिओप्लास्टी होणार आहे. विमान सुरक्षित खाली उतरले. मात्र, विमानाचे चेन्नईला होणारे पुढील उड्डाण रद्द करण्यात आले. प्रवाशांची व्यवस्था दुसऱ्या फ्लाईटमध्ये करण्यात आली आहे. जर लँडीगला जास्त वेळ लागला असता तर कर्मचाऱ्याचा जीव धोक्यात आला असता. तसेच विमानात गोंधळ उडाला असता. मात्र, सुदैवाने विमान लँडिंग होताना ही घटना घडल्याने पुढील अनर्थ टळला आणि कर्मचाऱ्याला तत्काळ रुग्णालयात नेता आले.