नवी दिल्ली India China Border : सरकारनं भारत-चीनच्या संवेदनशील सीमेवर इंडो तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) च्या तीन बटालियन तैनात करण्यास मंजुरी दिली आहे. सरकारनं अरुणाचल प्रदेशमध्ये ITBP ची आणखी बॉर्डर आउट पोस्ट (BOPs) स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सूत्रांनी ईटीव्ही भारतला सांगितलं की, केंद्रानं फेब्रुवारीमध्ये ITBP साठी सात अतिरिक्त बटालियन तयार करण्यास मान्यता दिली होती.
सीमाभागातील सुरक्षा वाढेल : नव्यानं मंजूर झालेल्या सात बटालियनपैकी, तीन आता तैनातीसाठी सज्ज आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, अधिक ITBP चौक्या उभारण्यानं आणि नवीन बटालियन तैनात केल्यानं भारतीय सुरक्षा यंत्रणांना चिनी सैन्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यास मदत होईल. 'अधिक बटालियन्स तैनात केल्यानं आणि बीओपीची स्थापना केल्यानं सीमाभागातील सुरक्षा निश्चितच वाढेल, असं ब्रिगेडियर (निवृत्त) बीके खन्ना यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं. 'भारत-चीन सीमेवर अशी अनेक क्षेत्रं आहेत जिथे मनुष्यवस्ती नाही. अधिक बटालियन्सची तैनाती आणि बीओपीची स्थापना केल्यानं निश्चितपणे त्या भागात रहिवासी येतील', असं त्यांनी नमूद केलं.
या भागात पायाभूत सुविधांचा अपुरा विकास : हे खरं आहे की, मूलभूत सुविधांच्या अभावामुळं सीमावर्ती भागात राहणारे लोकं आपली जागा सोडून इतर ठिकाणी जातात. भारत आणि चीनमधील एकूण ३४८८ किमी सीमेपैकी अरुणाचल प्रदेश चीनशी ११२६ किमी सीमा शेअर करतो. जम्मू आणि काश्मीर (१५९७ किमी), हिमाचल प्रदेश (२०० किमी), उत्तराखंड (३४५ किमी) आणि सिक्कीम (२२० किमी) ही राज्ये देखील चीनशी सीमा शेअर करतात. सरकारी आकडेवारीनुसार, भारत-चीन सीमेचं पूर्णपणे सीमांकन झालेलं नाही. सध्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचं स्पष्टीकरण आणि पुष्टी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा उंचीवरील प्रदेश असल्यानं या भागात पायाभूत सुविधांचा अपुरा विकास झाला आहे.
ITBP च्या कुठे किती पोस्ट : ITBP ही भारताच्या चिनी सीमेचं रक्षण करते. ITBP ने आतापर्यंत पूर्व सेक्टर (सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ ६७ बॉर्डर आउट पोस्ट (BOPs) स्थापन केल्या आहेत. त्याचप्रमाणे, पश्चिम सेक्टर (जम्मू आणि काश्मीर) बाजूनं ३५ आणि केंद्रीय क्षेत्र (हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड) मध्ये ७१ बीओपी स्थापन करण्यात आले आहेत.
राजनाथ सिंह यांच्या हस्ते ९० प्रकल्पांचं उद्घाटन : सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी, सीमा रस्ते संघटना (BRO) ने अलीकडेच अरुणाचल प्रदेशमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) ६७८ कोटी रुपये खर्चून आठ रस्ते पूर्ण केले. मंगळवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते एकूण ९० प्रकल्पांचं उद्घाटन होईल.
नेचिफू बोगद्याचं उद्घाटन : राजनाथ सिंह अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील बलीपारा-चारडुआर-तवांग (BCT) रस्त्यावर नेचिफू बोगद्याचं उद्घाटन करतील. हा धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा बोगदा आहे, ज्यामुळे सीमावर्ती भागातील सैन्य तसेच नागरिकांची जलद हालचाल होईल. हा बोगदा सुमारे ५ किमी अंतर कमी करेल आणि दाट धुक्याच्या भागात प्रवास आणि कनेक्टिव्हिटी सुलभ करेल, असं बीआरओनं सांगितलं.
हेही वाचा :
- Fake Army Officer Arrested: 'त्या' तोतया लष्करी अधिकाऱ्याचे अशाप्रकारे फुटले बिंग; थेट १५ ऑगस्टच्या कार्यक्रमातही झाला होता सहभागी
- Army Recruitment : खासदार केतकरांनी सैन्य भरतीच्या मुद्याला राज्यभेत घातला हात, हजारो अधिकाऱ्यांची पदे रिक्त, सरकारची कबुली
- Kargil Vijay Diwas 2023: पाक असो चीन सर्वांशी मुकाबला करण्यास सैन्य सिद्ध - माजी लष्करप्रमुख व्हीपी मलिक