नवी दिल्ली : १५ ऑगस्ट आता काही तासांवर आला असून लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची तयारी सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवून देशाला संबोधित करतील. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यावरून सर्वप्रथम तिरंगा फडकावला (Independence Day 2023) होता. त्यानंतर इतर पंतप्रधानांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण सुरू केले. अखेर झेंडा फडकवण्यासाठी लाल किल्ल्याचीच निवड का करण्यात आली?
लाल किल्ला 1857 च्या क्रांतीचा साक्षीदार आहे : याविषयी दिल्ली विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ. सुरेंद्र सिंह यांनी सविस्तर सांगितले. 'आपण इंग्रजांविरुद्ध एकत्र आलो आणि एक चळवळ सुरू केली. त्याला 1857 ची क्रांती म्हणतात. लाल किल्ला या क्रांतीचा साक्षीदार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी हे एक असे स्मारक होते, जिथे आपल्याला इंग्रजांविरुद्ध एकत्र येण्यास मदत झाली. त्या काळात लाल किल्ल्याचा वापर इंग्रजांविरुद्धच्या चळवळीसाठी केला गेला. वर्षानुवर्षे हा किल्ला स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक राहिला आहे', असे सुरेंद्र सिंह यांनी सांगितले.
लाल किल्ला इंग्रजांविरुद्धच्या चळवळीची ओळख बनला : पंडित नेहरूंनी पंतप्रधान म्हणून 1947 ते 1963 पर्यंत 17 वेळा लाल किल्ल्यावरून भाषण दिले. लाल किल्ला हे दिल्लीच्या सत्तेचे केंद्र असल्याचे सिंह यांनी सांगितले. आग्रा, फतेहपूर सिक्री आणि इतर ठिकाणी पॉवर सेंटर बनवण्याचा प्रयत्न झाला, पण ते होऊ शकले नाही. ईस्ट इंडिया कंपनीने दिल्ली हेच सत्तेचे केंद्र म्हणून स्थापन केले. त्यामुळे लाल किल्ला हा इंग्रजांविरुद्धच्या चळवळीची ओळख बनला होता, असे प्राध्यापक सिंह यांनी सांगितले.
लाल किल्ला सत्तेचे केंद्र राहिला आहे : याविषयी जेएनयूचे प्राध्यापक नजफ हैदर स्पष्ट करतात की, 'ध्वज फडकवण्यासाठी लाल किल्ल्याचीच निवड का करण्यात आली याला एक कारण आहे. लाल किल्ला 1857 पूर्वी भारताचे राज्यकर्ते असलेल्या मुघलांच्या वर्चस्वाचे प्रतिक आहे. बंडानंतर इंग्रजांनी आपली सत्ता काबीज करून तेथे आपला झेंडा फडकावला होता. त्यानंतर देश स्वतंत्र झाला. तेव्हा लाल किल्ल्याला सत्तेचे केंद्र मानून तेथला इंग्रजांचा झेंडा काढून तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. तेव्हापासून आजतागायत ही प्रथा कायम आहे'.
लाल किल्ल्याचा इतिहास : लाल किल्ला मुघल सम्राट शाहजहानने बांधला होता. १६३९ मध्ये सुरू झालेले बांधकाम सुमारे १० वर्षे चालले. १८५७ पर्यंत येथे मुघलांचे राज्य होते. सध्या येथे अनेक संग्रहालये बनवण्यात आली आहेत. १८५७ च्या बंडाच्या संदर्भात येथे खास संग्रहालय बांधण्यात आले आहे. येथे एक फाशी घर देखील आहे. लाल किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर दोन तोफाही आहेत. त्याचे निरीक्षण आणि संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) करत आहे.
हेही वाचा :