कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. तृणमूल काँग्रेसने आपल्या उमदेवारांच्या नावांची यादी जाहीर केली. यात काही जणांची तिकीटे कापण्यात आली आहेत. तिकीटे कापल्यानंतर काही नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपाची वाट धरली. तर काही जण पक्षातच आहेत. दक्षिण 24 परागणा येथील माजी आमदार अर्बुल इस्लाम यांचे यंदा तिकीट कापण्यात आले आहे. त्यानंतर पक्षाप्रतीचे आपले प्रेम व्यक्त करताना अर्बुल इस्लाम यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
माझे पक्षावर खूप प्रेम आहे. पक्षाने पाकिस्तानातील उमेदवाराला जरी उभे केलं. तरी मी त्याचा विजय होईल, हे सुनिश्चित करेल, असे विधान त्यांनी केले. अर्बुल इस्लाम यांच्याऐवजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टर रेजूल करीम यांना मैदानात उतरवलं आहे.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 291 मतदासंघासाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. यांमध्ये 50 महिला आणि 42 मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे. तसेच, दीदी नंदीग्राममधून स्वतः निवडणूक लढवणार आहेत. तसेच, यावेळी 80 वर्षांवरील उमेदवारांना तिकीट देण्यात आले नाही. दरम्यान, ममतांनी तीन जागा कलिम्पोंग, दार्जिलिंग आणि कुरसेओंग येथे आपले उमेदवार उतरवले नाहीत.
सत्तेत येण्यासाठी भाजपा आक्रमक -
राज्यात सत्तेत येण्यासाठी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या एका महिन्याभरात तृणमूलमध्ये नाराज असलेल्या अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राज्यातील बॅनर्जी यांचे दहा वर्षांची सत्ता संपवण्यासाठी भाजपा आक्रमक मोहीम राबवित आहे. दरम्यान, रविवारी अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर भाजपात प्रवेश केला.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक -
पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडेल. तर दुसरा टप्पा हा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पातील मतदान 17 एप्रिलला, तर सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठवा टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल. तर 2 मेला निकाल जाहीर होतील.
हेही वाचा - ममता बॅनर्जी व्हिलचेअरवरून करणार प्रचार; रूग्णालयातून ममता बॅनर्जींनी जारी केला व्हिडीओ