होळी हा एक हिंदू सण आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी सण पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा रंगांचा एक सण आहे. देशभरात होळी अनेक नावे आहेत. या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, धुळवड, होळी पौर्णिमा, धूलिवंदन व रंगपंचमी अशी विविध नावे आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी होळी साजरी करताना अनेक प्रथा आहेत. त्याविषयी आपण जाणून घेऊ...
भारताचे विविध प्रांत आणि तेथील होळी उत्सवाची नावे -
- उत्तर प्रदेश - लाठमार होळी
- उत्तराखंड - खडी होली, कुमाऊ,
- पंजाब - होला मोहल्ला
- बंगाल - वसंत उत्सव आणि डोल जत्रा
- गोवा - शिग्मो, उक्कुली
- मणिपूर - याओसांग
- केरळ - मंजाल कुली
- बिहार - फागुवा
- आसाम - फाकुवा किंवा फागुवा
- कर्नाटक - बेदारा वेश
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात. पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. होळी नंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला' धुळवड' असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.
कोकणातील शिमगोत्सव -
कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते. याला ‘होम’ लागणे असा शब्दप्रयोग वापरतात. काही गावात होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरत राहतात अशी प्रथा दिसते. तर कोकणात चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे होल्टा होम प्रकार केला जातो.
कोळी बांधवाचा शिमगा -
कोळी बांधव आणि त्यांची कुटुंबे शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात. मासेमारीसाठी पुरुष समुद्रावर जातात पण होळीच्या दुसऱ्या दिवशी मात्र होडीवर जायचा मान घरच्या स्त्रियांनाही मिळतो. म्हणून स्त्रियांसाठी हा विशेष उत्सवाचा दिवस असतो. पारंपरिक वेशात कुटुंबीय होडीवर जातात. काही लोक होडी समुद्रात नांगरून पूजा करतात तर काही समुद्रात होडीतून फेरी मारत मारत होडीत पूजा करतात.
उत्तर प्रदेशात लाठमार होळी -
उत्तर भारतातील व्रज भागात होळीचे महत्त्व विशेष आहे. येथील कृष्ण आणि होळी असे धार्मिक आचार प्रसिद्ध आहेत. येथे लाठमार होळी साजरी करतात. पत्नी आपल्या पतीला काठीने मारते. पती लाकडी ढालीनी स्वत:चा बचाव करतो. याला पोराणिक आधार आहे. श्रीकृष्ण आपली सर्वांत प्रिय भक्त राधेला भेटायला तिच्या गावी गेला होता. तेव्हा तिथल्या गवळणी काठ्या घेऊन त्यांच्या मागे लागल्या होत्या. त्याचीच आठवण जागवण्यासाठी ही लाठमार होळी साजरी होते.
पश्चिम बंगालमध्ये गौरपौर्णिमा -
पश्चिम बंगालमध्ये वैष्णव संप्रदायात "गौरपौर्णिमा" या नावाने हा दिवस चैतन्य महाप्रभू यांची जन्मतिथी म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीप्रमाणेच भक्तिभावाने साजरा केला जातो.
आदिवासी समाजात होळी -
आदिवासी संस्कृतीमध्ये होलिका उत्सवात पुरुष महिलांच्या वेशभूषा करतात. आदिवासी बांधव स्त्री वेष परिधान करून पाच दिवस होळी उत्सव साजरा करतात. विशेष म्हणजे महिलांचा वेष परिधान करून फिरताना या पुरुष मंडळींना लाज वाटत नाही तर ही मंडळी गर्वाने हे वेष परिधान करून संपूर्ण सातपुडा पालथा घालतात. आदिवासी संस्कृतीत महिलांना अनन्यसाधारण महत्व आहे, याचेच प्रतीक हा होळी उत्सव आहे.
पंजाबमध्ये होला मोहल्ला -
पंजाबामध्ये तीन दिवस होल्ला मोहल्ला हा सण साजरा केला जातो. यात निहंग शिखांना पारंपरिक युद्ध कला शिकवली जाते. दहावे शीख गुरू गोविंदसिंगांनी ही परंपरा सुरू केली. तेव्हापासून होळी साजरी केली जाते. वेगवेगळ्या मैदानी स्पर्धा घेतल्या जातात.
होळी सणामागील आख्यायिका -
एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे. अशाप्रकारे, हिंदूंच्या इतर सणाप्रमाणे होलिका दहन देखील वाईटावर चांगल्याचा विजयाचे चांगले प्रतीक आहे. वाईट गोष्टींवर विजय मिळवणे ही या सणाची व्याख्या आहे