बेंगळुरू : माजी मंत्री आणि धारवाड ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विनय कुलकर्णी यांना धारवाडमध्ये 30 दिवस राहण्याची परवानगी मागणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. 2016 मध्ये भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप कुलकर्णी यांच्यावर होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कुलकर्णी यांना जामीन मंजूर करताना चार अटी घातल्या होत्या, ज्यात न्यायालयाच्या परवानगीशिवाय धारवाड जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही, या अटीचा समावेश आहे.
प्रवेशास बंदी असताना तिकीट कसे दिले? : माजी मंत्री विनय कुलकर्णी यांच्या याचिकांवर सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती के. नटराजन यांच्या अध्यक्षतेखालील एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावल्या. सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले की, 'विनय कुलकर्णी यांना धारवाडमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र आता ते धारवाड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांनी धारवाडमध्ये प्रवेशाची परवानगी देण्याची विनंती केली आहे'. यावर उत्तर देताना न्यायालयाने विचारले की, 'त्यांना तिकीट देणार्या काँग्रेस पक्षाला त्यांना धारवाडमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे, हे माहीत नव्हते का? असे असताना कॉंग्रेसने त्यांना तिकीटच कसे दिले? तसेच, ट्रायल कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पालन करण्याचा आदेश दिला आहे. अशावेळी तुम्ही सुप्रीम कोर्टाला विचारू शकता. तुम्ही इथे प्रश्न का विचारलात,' असा सवाल कोर्टाने केला.
प्रकरणाची पार्श्वभूमी काय? : विजय कुलकर्णी यांच्यावर 2016 मध्ये भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. ते सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आणि कुलकर्णींना अटक करण्यात आली. हत्येप्रकरणी सीबीआयने विनय कुलकर्णींसह आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला असून, पहिले आरोपी विनय कुलकर्णी आहेत. त्यांनी 9 महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात घालवला. अखेरीस सर्वोच्च न्यायालय आणि बेंगळुरू येथील लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने त्यांना जामीन दिला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कुलकर्णी यांना जामीन मंजूर करताना चार अटी घातल्या असून त्यात न्यायालयाच्या परवानगीशिवाय धारवाड जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही, या अटीचा समावेश आहे.
विनय कुलकर्णी यांच्या पत्नीने दाखल केली उमेदवारी : आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुलकर्णी यांनी धारवाड ग्रामीण मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विनय कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून धारवाडमध्ये उमेदवार म्हणून प्रवेश करण्यास न्यायालयाची परवानगी मागितली होती. यापूर्वी विनय कुलकर्णी यांनी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात याचिका दाखल करून 50 दिवस धारवाडमध्ये राहण्याची परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. गुरुवारी विनय कुलकर्णी यांच्या वतीने त्यांच्या पत्नी शिवलीला कुलकर्णी यांनी धारवाड ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली.
हेही वाचा : Shiv Sena Burnt Pakistan Flag : भारतीय जवानांवरील हल्ल्याचा शिवसेनेकडून निषेध, पाकिस्तानचा झेंडा जाळला