अहमदाबाद (गुजरात): गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार विपुल पटेल शुक्रवारी विधानसभेत ठराव मांडणार आहेत. बीबीसीच्या माहितीपटात दाखविलेल्या बनावट निष्कर्षांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी या प्रस्तावात केली जाईल. 2002 च्या गोध्रा दंगलीनंतर पटेल यांनी बीबीसीवर पुन्हा एकदा तत्कालीन राज्य सरकारला दोष देण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला. प्रस्तावानुसार, बीबीसी डॉक्युमेंटरी हा भारताची जागतिक प्रतिमा खराब करण्याचा निम्न स्तराचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
काय म्हटले आहे ठरावात: विधानसभेच्या सचिवालयाने मंगळवारी सामायिक केलेल्या ठरावाच्या सारांशानुसार, भारत एक लोकशाही देश आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा त्याच्या घटनेचा गाभा आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की माध्यम संस्था अशा स्वातंत्र्याचा गैरवापर करू शकते. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) डॉक्युमेंटरी 'इंडिया: द मोदी क्वेश्चन' दोन भागात आहे, जो 2002 च्या गुजरात दंगलीशी संबंधित काही पैलूंच्या तपासणीवर आधारित असल्याचा दावा करतो. गुजरात दंगलीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते.
बीबीसीच्या कार्यालयांवर टाकले होते छापे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसी डॉक्युमेंट्रीला याआधीही मोठ्या प्रमाणात विरोध झाला आहे. भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांच्या सत्ताधारी पक्षाने याला प्रचाराचा भाग म्हटले होते. भारत सरकारने या माहितीपटाच्या प्रसारणावर बंदी घातली होती. बंदीनंतर काही दिवसांनी बीबीसीच्या भारतातील कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले. ज्याला भारतातील विरोधी पक्षांनीही विरोध केला होता. काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी लंडनमधील बीबीसीवरील कारवाईला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला म्हटले आहे.
ब्रिटिश खासदारानेच केला होता विरोध: दरम्यान ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी बीबीसीच्या माहितीपटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ते म्हणाले होते की, बीबीसी डॉक्युमेंटरी बाहेरच्या संस्थेने बनवली आहे, त्याचा सत्याशी काहीही संबंध नाही. डॉक्युमेंट्री बनवण्यापूर्वी गुजरात दंगलीशी संबंधित सर्व तथ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे बॉब ब्लॅकमन यांनी सांगितले होते. बॉब ब्लॅकमन म्हणाले होते की, सुप्रीम कोर्टानेही पीएम मोदींविरोधात चौकशी केली होती, ज्यामध्ये एकही आरोप सिद्ध झाला नाही. बीबीसीच्या माहितीपटात पंतप्रधान मोदींविरोधात अतिशयोक्तीपूर्ण कथन दाखवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हेही वाचा: दिल्लीतील युवकाने १४ वेळा झोमॅटोवरून मागवल्या भांगेच्या गोळ्या, अन् झालं असं