नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे गेल्या २५ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन लवकरात लवकर संपावे यासाठी सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. यापूर्वी कृषी कायद्यांमध्ये केलेल्या बदलांनंतर तुमच्या याबाबत काय अडचणी आहेत, याबाबत चर्चा करण्यासाठी एक ठराविक तारीख निश्चित करुन आम्हाला कळवावी अशा आशयाचे पत्र सरकारने कृषी संघटनांना पाठवले आहे.
यापूर्वीच्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ..
यापूर्वी सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या सर्व फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. या कायद्यांबाबत शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सहसचिव विवेक अग्गरवाल यांनी या पत्रात म्हटले आहे. आंदोलन करणाऱ्या ४० प्रमुख कृषी संघटनांना हे पत्र पाठवण्यात आले आहे.
यापूर्वीचा प्रस्ताव फेटाळला..
यापूर्वी ९ डिसेंबरला सरकारने कृषी कायद्यांमध्ये काही बदल करुन त्याबाबतचा प्रस्ताव कृषी संघटनांना पाठवला होता. मात्र, कृषी संघटनांनी हा प्रस्ताव फेटाळला होता. हा प्रस्ताव व्यापक स्वरुपाचा नसून, आम्हाला अपेक्षित बदल त्यात नाही. त्यामुळे सरकारने सर्व कायदेच रद्द करावेत असे या संघटनांचे म्हणणे होते.
दोन दिवसांमध्ये तोमर घेणार आंदोलक शेतकऱ्यांची भेट - अमित शाह
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे येत्या दोन दिवसांमध्ये दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. ते पश्चिम बंगालमधील एका पत्रकार परिषदेत बोलत होते. "मला नक्की तारीख किंवा वेळ माहिती नाही. मात्र, उद्या किंवा परवा तोमर शेतकऱ्यांशी चर्चा करतील" असे शाहांनी रविवारी स्पष्ट केले.
हेही वाचा : 'पंतप्रधानांच्या 'मन की बात' कार्यक्रमावेळी वाजवाव्या थाळ्या'; शेतकऱ्यांचे देशवासियांना आवाहन