कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार शिगेला आहे. आतापर्यंत 300 पेक्षा जास्त भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येच्या चौकशीत एक इंच प्रगतीसुद्धा दिसून येत नाही, असा दावा केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी केला. अमित शाह दोन दिवसीय पश्चिम बंगालच्या दौऱयावर असून आज त्यांचा दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. पत्रकार परिषद घेत, त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
अमित शाह यांनी रोड शो केला. त्यांच्या रोड शो ला मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केले. बंगालमधी भष्ट्राचाराची सर्वांना माहिती आहे. मात्र, सरकार आपल्या नेत्यांना वाचवत आहे, अशी टीका शाह यांनी केली.
शिक्षण क्षेत्रावरून टीका -
पश्चिम बंगालमधील शिक्षण क्षेत्रावरून त्यांनी टीका केली. बंगालमधील 90 टक्के प्राथिमक शाळेमध्ये डेस्क नाहीत. 30 टक्क्यांपेक्षा अधिक शाळामध्ये क्लासरूम नाहीत. तर 10 टक्के शाळामध्ये वीज जोडणी नाही. याचबरोबर 56 टक्के शाळांमध्ये शौचालय नसल्याचे त्यांनी सांगितले.
टीएमसी भष्ट्र सरकार -
भ्रष्टाचार, कुंटुंबवाद, हिंसाचार, बॉम्बस्फोट आणि कार्यकर्त्यांची हत्या या संदर्भात बंगाल पहिल्या क्रमांकावर आहे. टीएमसी हा कौटुंबिक पक्ष झाला आहे. या भष्ट्र सरकारला नागरिक उखडून टाकतील, असे शाह म्हणाले. तसेच भाजपाला एकदा संधी द्या आम्ही सोनार बांगला बनवू आणि भाजपाचा विजय झाल्यास बंगालच्या मातीतलाच मुख्यमंत्री देऊ, असेही शाह म्हणाले.
तृणमूलला सरकारला पराभूत करू -
अमित शाह यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर आणि कार्यकर्त्यांवरही टीका केली. आमच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या हल्ल्यामुळे भाजपाची गती थांबेल किंवा भाजपा आपले पाऊल मागे घेईल, या भ्रमात तुम्ही पडू नये. या प्रकारची हिंसाचाराचे वातावरण जितके तुम्ही तयार कराल. तितके भाजपा बंगालमध्ये स्वत: ला मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम करेल. तसेच आम्ही लोकशाही मार्गाने हिंसाचाराला उत्तर देऊ आणि बंगालमधील आगामी निवडणुकांमध्ये आम्ही या सरकारला पराभूत करून दाखवू, असे शाह म्हणाले.
प. बंगालमध्ये राजकीय स्थिती काय?
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे 148 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. गेली निवडणूक 2016 मध्ये पार पडली होती. ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाने 211 जागांवरील विजयासह सपशेल बहुमत मिळवले व पश्चिम बंगालमधील आपली सत्ता राखली. तर काँग्रेसला 44 , डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.
हेही वाचा - भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल