साहिबगंज - वाराणसीवरुन निघालेले गंगाविलास क्रूझ शुक्रवारी सायंकाळी साहिबगंजला पोहोचले. गंगाविलास क्रूझने आलेल्या विदेशी पाहुण्यांचे बुके देऊन आणि पारंपरिक आदिवासी नृत्य करुन जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी साहिबगंजचे जिल्हाधिकारी राम निवास यादव, राजमहलचे आमदार अनंत ओझा, पोलीस अधीक्षक अनुरंजन किस्पोट्टा आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
दोन दिवस अगोदरच पोहोचले क्रूझ : गंगाविलास क्रूझ 23 जानेवारीला साहिबगंज पोहोचणार होते. मात्र त्यापूर्वीच साहिबगंजला गंगाविलास क्रूझ पोहोचले आहे. शुक्रवार सायंकाळी क्रूझ साहिबगंजमध्ये पोहोचले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तगडी सुरक्षा व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. तसेच विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सर्व व्यवस्था देखील करण्यात आली होती.
प्रवाशांना मारला गावातून फेरफटका : जिल्हाधिकारी रामनिवास यादव यांच्या नेतृत्वाखाली स्वित्झर्लंडवरुन आलेल्या प्रवाशांना शनिवारी मल्टीमॉडल टर्मिनलचा फेरफटका मारला. यावेळी जवळच्या गावालाही पाहुण्यांनी भेट दिली. त्यांनी लहान मुले आणि वडिलधाऱ्यांना भेटताना गावातील फोटो काढले. झारखंडच्या या गावातील अनेक आठवणीही त्यांनी टिपून घेतल्या. प्रवाशांनी झारखंडमधील वातावरण शांत असल्याचे यावेळी सांगितले.
प्रवाशांनी नमस्ते आणि जोहर म्हणत केला वार्तालाप : गंगाविलास क्रूझने दाखल झालेल्या प्रवाशांनी गावकऱ्यांना नमस्ते आणि जोहार म्हणत त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. गावकऱ्यांविषयी अनेक माहिती जाणून घेतली. गावकऱ्यांशी बोलल्यानंतर पर्यटकांनी हा त्यांच्या आयुष्यातील सुवर्ण आठवणी असल्याचेही यावेळी सांगितले. हा अनुभव त्यांच्या कायम लक्षात राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. झारखंडचे लोक खूप मनमिळाऊ आहेत. यासोबतच जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही त्यांना खूप सहकार्य केल्याचे यावेळी पर्यटकांनी सांगितले आहे. त्यांच्या या जंगी स्वागतासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचेही आभार मानले.
प्रसिद्ध सिल्कपासून बनवलेले स्कार्फ भेट : आमदार अनंत ओझा, जिल्हाधिकारी राम निवास यादव आणि पोलीस अधिक्षक किस्पोटा यांनी परदेशी पर्यटकांचे जंगी स्वागत केले. त्यांना साहिबगंजच्या प्रसिद्ध सिल्कपासून बनवलेले स्कार्फ भेट देण्यात आले. त्यानंतर या सगळ्या अधिकाऱ्यांनी या परदेशी पाहुण्यांचा निरोप घेत त्यांना क्रूझपर्यंत सोडण्यात आले.