श्रीगनर- कुपवाड्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक युगल मनहास यांनी सांगितले की, खुर्हामा गावात 36 वर्षीय व्यक्तीने आधी मुलीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर धारदार शस्त्राने गळा चिरला.
नेमकी काय घटना घडली? जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे कुटुंबाच्या घराजवळील शेडमध्ये बुधवारी एका मुलीचा गळा चिरलेला मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मुलीच्या नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले की, बुधवारी संध्याकाळी त्यांची मुलगी दुकानातून काहीतरी आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. मुलगी उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाइकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित सोमवारी मुलीचे वडील मोहम्मद इक्बाल खटाना याला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. शवविच्छेदनाच्या अहवालात मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तसेच तिचा गळा धारदार शस्त्राने चिरण्यात आल्याची बाब उजेडात आली.
आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली संशयित आरोपी असलेल्या मुलीच्या वडिलांची चौकशी केल्याचे एसएसपीने सांगितले. ते म्हणाले, की मुहम्मद इक्बाल खटाना याने तपासादरम्यान मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या एक वर्षापासून पत्नीशी त्याचे भांडण होत आहे. त्या दिवशीही त्याचे पत्नीशी भांडण झाले होते.
आत्महत्येला विरोध केला अन् जीव गमाविला- आरोपी व्यवसायाने वाहनचालक आहे. नेहमीप्रमाणे तो दुपारी 4 वाजता घरी पोहोचला. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लाकूड तोडण्याचे घरातील कामे करत होता. त्यादिवशी पुन्हा त्याचे पत्नीबरोबर भांडण झाले. यानंतर संतापलेला इक्बाल आपल्या गाडीचा टायर पंक्चर झाल्याचे सांगून घरातून चाकू घेऊन निघून गेला. रागाच्या भरात इकबाल आत्महत्या करण्यासाठी घरातून जात होता. चिंतेत झालेली मुलगी वडिलांच्या काळजीने सोबत येण्याचा हट्ट करू लागली. मन वळविण्याकरिता इक्बालने मुलीला दहा रुपये दिले. पण तरीही ती सोबत येण्यासाठी वडिलांच्या मागे लागली. साक्षीदाराने पोलिसांना सांगितले, की इक्बालने मुलीला गाडीतून उचलले. त्यानंतर एका ट्रान्सफॉर्मरजवळ कार थांबवली. तिथे त्याने मुलीची गळा दाबून हत्या केली. ही घटना रात्री 8.20 वाजता घडली.
आधी हत्या मग तक्रार देण्यासाठी पोहोचला पोलिसांत.. इक्बालने मृतदेह त्याच्या काकांच्या घराजवळील लाकडी शेडखाली ठेवला. चाकूने मृत मुलीचा गळा चिरला. एसएसपीने सांगितले की, हत्या केल्यानंतर इक्बाल स्वत: खरहामा पोलीस चौकीत आला. त्याने मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवून तिला शोधण्याची विनंती केली. परंतु इकडे कुटुंबातील सदस्य आणि स्थानिक लोकांना शेडमध्ये मुलीचा मृतदेह सापडला. या प्रकरणात इक्बालला संशयावरून अटक करताच संपूर्ण हत्येचा उलगडा झाला. निर्दयी पित्याविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी स्थानिक नागरिकांमधून मागणी होत आहे.