भटिंडा (पंजाब) Diwali 2023 : दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण. या सणाची संपूर्ण देश आतुरतेनं वाट पाहात असतो. खास करून बच्चेकंपनीमध्ये दिवाळीला फटाके फोडण्याची खूप क्रेझ असते. मात्र पंजाबच्या भटिंडामधील तीन गावं याला अपवाद आहेत. या गावांमध्ये दिवाळीच्या दिवशी ना दिव्यांची आरास होते, ना फटाके फोडले जातात!
फटाके फोडण्यावर बंदी का : भटिंडा जिल्ह्यातील फूस मंडी, भागू आणि गुलाबगढ या तीन गावांजवळ सैन्याची छावणी आणि दारूगोळ्याचा डेपो आहे. यामुळे येथे गेल्या अनेक दशकांपासून फटाके आणि दिव्यांविना दिवाळी साजरी केली जाते. या गावांमध्ये फटाके वाजवण्याविरुद्ध प्रशासनाकडून कडक निर्देश आहेत. त्यामुळे गेल्या पाच दशकांपासून त्यांनी मनाप्रमाणे दिवाळी साजरी केली नसल्याचा दावा या गावांतील वृद्धांनी केलाय.
फटाके फोडले तर कायदेशीर कारवाई : येथे १९७६ मध्ये सैन्याची छावणी बांधण्यात आली. बांधकामापूर्वी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्यात आली होती. 'मुलं दिवाळीत फटाके फोडण्याचा आग्रह धरतात तेव्हा त्यांना त्यांच्या आईच्या घरी किंवा मावशीकडे पाठवलं जातं. जर कोणी प्रशासकीय सूचनेविरुद्ध फटाके फोडले तर त्याच्यावर जिल्हा प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई केली जाते', असं गावातील एका वृद्धानं सांगितलं.
नवीन बांधकामावर बंदी : याशिवाय, परिसरात कोणत्याही नवीन बांधकामावर बंदी घालण्यात आली आहे. 'गावातील कोणीही रात्रीच्या वेळी आपल्या शेतात पाणी देऊ शकत नाही किंवा शेतात काही शिजवू शकत नाही. असं केलं तर सैन्य ताबडतोब तेथे पोहोचतं आणि त्या व्यक्तीला परिसरात आग न लावण्याची चेतावणी देऊन त्याची चौकशी करतं, असं एका गावकऱ्यानं सांगितलं. 'विशेषत: दिवाळीच्या सणात आणि भातपिकाच्या हंगामात जेव्हा पाळत अधिक कडक होते, तेव्हा समस्या वाढतात', असं गावकरी म्हणाले.
ग्रामस्थांची मागणी काय : आर्मी कॅन्टोन्मेंट आणि डेपोच्या परिसरात रस्ता जोडणी नसल्यामुळे गावातील जमिनीच्या दरांना मोठा फटका बसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. सणासुदीच्या वेळी या गावांमध्ये बाहेरगावचे नातेवाईक येण्यास टाळाटाळ करतात, कारण ते त्यांच्या मनाप्रमाणे सण साजरा करू शकत नाहीत. त्यामुळे आता वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असलेला दीपोत्सव साजरा करता यावा यासाठी प्रशासनानं याबाबत योग्य ती पावले उचलावीत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
हेही वाचा :