कोलकाता - अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि निशिकांत ठाकूर यांना वाय + श्रेणी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानेही याबाबत बुधवारी आदेश जारी केले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) भाजपा नेते मिथुन यांना वाय + संरक्षण देईल. बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी बोर्ड स्थापन करण्यात आला आहे. नुकत्याच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सर्व नेत्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपात सामिल झाले आहेत. भारतीय जनता पक्षात प्रवेश होताच मिथुन चक्रवर्ती यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहयला मिळाले. मला नेहमीच वंचितांसाठी काम करायचे असून त्यासाठी भाजपाने मला व्यासपीठ उपलब्ध करून दिले, असे चक्रवर्ती म्हणाले. मला समाजातील गरीब वर्गासाठी काम करण्याची इच्छा होती आणि ती इच्छा आता पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. तसेच या प्रसंगी चक्रवर्ती यांनी त्यांच्या एका चित्रपटाचा संवादही ते म्हणाले. ‘‘अमी जोल्धोराओ नोई, बीले बोराओ नोई … अमि इक्ता कोबरा, ईक चोबोल-ई छोबी ( अर्थात मला निरुपद्रवी साप मानण्याची चूक करू नका, मी प्रथम क्रमांकावर असलेला कोब्रा आहे, मी एकाच वेळी लोकांना डंक मारून आणि ठार करू शकतो), असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले.
मिथून चक्रवर्ती राज्यसभेत टीएमसीकडून खासदार होते -2011 मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मिथून चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसमधून पश्चिम बंगालकडून राज्यसभेत खासदार राहिले आहेत. मात्र ते राजकारणात फार रमत नसल्याचं दिसत होतं. शारदा चिट फंड प्रकरणात नाव आल्याने अवघ्या दोन वर्षातच त्यांनी राज्यसभा सभागृहाचा राजीनामा दिला. मिथून चक्रवर्ती हे सध्या वयाच्या सत्तरीत आहेत. गेली अनेक वर्षे सेलिब्रेटी राहिल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर तीन वेळा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला आहे.
वाय + सुरक्षा काय असते?
वाय प्लस श्रेणीमध्ये एक एस्कॉर्ट वाहन आणि वैयक्तिक सुरक्षारक्षकासह निवासस्थानी एक गार्ड कमांडर आणि चार गार्ड तैनात असतात. या गार्डपैकी एक हा उपनिरीक्षक पदाचा अधिकारी असतो. तर इतर तीन सुरक्षारक्षकांकडे शस्त्र असतं. भारतातील सुरक्षा व्यवस्था झेड प्लस, झेड, वाय, आणि एक्स या चार विभागांमध्ये विभागलेली आहे. खासदार, आमदार, नोकरशहा, माजी नोकरशहा, न्यायाधीश, माजी न्यायाधीश, व्यापारी, क्रिकेटपटू, चित्रपट आभिनेते, संत, कधीकधी सामान्य व्यक्तींना या सुरक्षेचा लाभ घेता येतो. व्हीआयपी लोकांच्या जिवाला धोका असेल तर सुरक्षा देणे ही सरकारची जबाबदारी आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री ममता बनर्जी प्रचारादरम्यान जखमी, षडयंत्र रचल्याचा आरोप