पुणे - भारतात कोरोना लस वितरणाचा शुभारंभ झाला असून पुण्यातील सीरम कंपनीतून तीन कंटेनरद्वारे लस विमानतळावर नेण्यात आली. विमानतळावरून कार्गो फ्लाईटने भारतातील विविध राज्यांत लसीचा पुरवठा करण्यात आला. पहाटे ५ वाजता तीन कंटेनरमधून लस विमानतळावर नेण्यात आली. यावेळी सीरम कंपनीबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कंटेनरसमोर नारळ फोडून लस वितरणाची सुरुवात करण्यात आली. आता १६ जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरू होणार आहे.
सहा कंटेनरपैकी ३ कंटेनरमधून लस वाहतूक -
सोमवारी सायंकाळी 6 कंटेनर इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यातले तीन कंटेनर पहाटे विमानतळावर गेले. तेथून स्पाईस जेट, एअर इंडियासह इतर कार्गो विमानांनी दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता या ठिकाणी लस नेण्यात आली. लस वाहतुकीसाठी कोल्ड स्टोरेज बॉक्सचा वापर करण्यात आला. अत्यंत चोख नियोजन करत लस पोहचवण्यात येत आहे. सहा पैकी आत्तापर्यंत ३ कंटेनरमधून लस विमानतळावर नेण्यात आली. आणखी तीन कंटेरन जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नाही.
स्पाईस जेट कंपनीच्या विमानाने कोविशिल्ड लसीचे बॉक्स दिल्लीला पाठविण्यात आले. एकूण ३४ बॉक्समधून लस नेण्यात आली. या बॉक्सचे वजन सुमारे १ हजार होते. स्पाईस जेट कंपनीचे चेअरमन आणि संचालक अजय सिंह यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. तर एअर इंडियाच्या विमानातून कोरोना लस अहमदाबादला रवाना झाली.
५६ लाखांचे डोस विविध शहरात पोहचले -
पुण्यातून सीरमची कोविशिल्ड लस देशातील विविध राज्यांत पोहचवण्यात येत आहे. याबाबतची अधिकृत माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली. " आज पुण्यातून सुमारे ५६ लाख लसीचे डोस एअर इंडिया, स्पाईस जेट आणि इंडिगो एअरलाईन्सच्या ९ फ्लाईटद्वारे देशातील विविध भागात पोहचवण्यात येतील. यामध्ये दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भूवनेश्वर, पाटणा, बंगळुरू, लखनौ, चंदीगड या शहरांचा समावेश आहे" अशी माहिती नागरी उड्डाण मंत्र्यांनी दिली.