हैदराबाद- कोविड -19 च्या लस वितरणाला प्राधान्य देणे सरकारचे प्राथमिक काम असेल. तसेच लस उपलब्ध झाल्यावर आरोग्यसेवा कर्मचारी आणि 65 वर्षांवरील लोकांना लस वितरण करताना प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी गुरुवारी दिली. 'शिफ्टिंग हेल्थकेअर पॅराडिजम इन अँड पोस्ट कोविड' या विषयावर फिक्कीने आयोजित केलेल्या वेबिनारला संबोधित करताना ते बोलत होते.
कोविड -19 ची लस येत्या काही महिन्यांत उपलब्ध होईल आणि जुलै-ऑगस्टपर्यंत 25-30 कोटी लोकांना 400-500 दशलक्ष डोस उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही ते म्हणाले. लस वितरण कार्यक्रमाला प्राधान्य देणे स्वाभाविक आहे. सुरूवातीला ही लस कोरोनायोद्धा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येईल, त्यानंतर 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना आणि नंतर 50 ते 65 वयोगटातील लोकांना लस देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतातील कोविड -19 च्या रुग्णांची संख्या 89.58 लाख एवढी झाली असून यात आज 45,576 रुग्णांची भर पडली आहे. अद्यापर्यंत 83.83 लाख रुग्ण यातून बरे झाले असून 1,31,578 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 93.58 टक्के एवढा आहे.
दरम्यान, केंद्रीय रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती त्यांनी गुरुवारी सोशल मीडियावर दिली. कोविड -19 ची सुरुवातीची लक्षणे जाणवल्यानंतर मी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने सावधगिरी बाळगून आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे ट्विट त्यांनी केले.
पंजाब- पंजाबमध्ये कोविड - 19 मुळे आणखी 16 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 4,556 वर पोहोचली आहे. तर आज 792 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांचा आकडा 1,44,177 वर पोहोचला आहे. राज्यात सद्या 6,194 कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामध्ये मोहाली 135, जालंधर 122 आणि लुधियानातील 108 रुग्णांचा समावेश आहे.
जम्मू-काश्मीर- गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील कोविड -19 च्या 560 नवीन रुग्णांची भर पडली असून कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1,04,715 वर पोहोचली आहे. तर आणखी पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 1,618 वर पोहोचली आहे, नवीन 560 कोरोनाबाधीतांपैकी जम्मू विभागात 247 तर काश्मीर विभागात 313 रुग्णांची नोंद करण्यात आली. श्रीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 130 रुग्णांची नोंद झाली आहे.
पश्चिम बंगाल- गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये कोविड -19 मुळे आणखी 53 लोकांचा बळी गेला असून मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 7,873 इतकी झाली आहे. राज्यात आज विविध भागांतून 3,620 कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 4,45,505 वर पोहोचली आहे.
लडाख - गुरुवारी लडाखमध्ये 60 कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या 7,623 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांत 66 रूग्ण या आजारातून मुक्त झाले आहेत. अद्यापर्यंत लेह आणि कारगिल या दोन जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे 94 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लेहमध्ये 54 तर कारगिलमध्ये 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गुजरात- गेल्या 274 तासांत गुजरातमध्ये 1,340 नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्ण संख्या 1,92,982 वर पोहोचली असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3,830 वर पोहोचली आहे. तसेच, आज 1,113 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले, असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.
हेही वाचा- राज्यात ५,५३५ नवीन रुग्णांचे निदान, १५४ रुग्णांचा मृत्यू