बेळगाव : बेळगावच्या गोगटे महाविद्यालयात बुधवारी इंटर कॉलेज फेस्टदरम्यान कर्नाटकचा झेंडा फडकवल्याने विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या एका गटाने ही मारहाण केली. बुधवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थी संगीताच्या तालावर नाचत होते. एक विद्यार्थी राज्याचा झेंडा हातात घेऊन नाचत होता. याला आक्षेप घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाने त्याला बेदम मारहाण केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. (College student beaten for waving Karnataka flag).
डीसीपीची प्रतिक्रिया : कायदा आणि सुव्यवस्था डीसीपी रवींद्र गडाडी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "कॉलेजमध्ये संध्याकाळी 7.30 च्या सुमारास इंटर-कॉलेज फेस्ट सुरू होता. यावेळी कन्नड झेंडा घेऊन नाचणाऱ्या विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आला. तीन विद्यार्थ्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. आम्हाला मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांकडून ही माहिती मिळाली. आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत. अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही."
कन्नड संघटनांची कारवाईची मागणी : दरम्यान कन्नड समर्थक संघटनांनी गुरुवारी कर्नाटकातील बेळगाव येथे महाविद्यालयीन उत्सवादरम्यान राज्याचा ध्वज फडकावल्यानंतर विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत आंदोलन सुरू केले. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादामुळे आणि 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या या भागाला भेट देण्याआधी बेळगावी येथे तणावाचे वातावरण असताना ही घटना घडली आहे. आंदोलकांनी बेळगाव-गोवा महामार्ग रोखून धरला. यावेळी त्यांनी महाविद्यालय, शासन, पोलीस, स्थानिक राजकारणी व एमईएसच्या विरोधात टायर पेटवून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे गोवा-खानापूर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.