कोलकाता : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी अरुणाचल प्रदेशातील तीन भारतीय वुशू खेळाडूंना व्हिसा नाकारण्यात आला. चीनच्या या निर्णयावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, चीनचे राजदूत झा लियू यांनी रविवारी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचं आवाहन केलंय. ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंध सध्या तरी स्थिर आहेत आणि दोन्ही देशांच्या नेत्यांचा संवाद कायम आहे. कोलकाता येथील चिनी महावाणिज्य दूत लियू यांनी पत्रकाराशी बोलताना अशी प्रतिक्रिया यावर दिलीय.
अर्थपूर्ण संवादाची गरज - उभय देशांच्या नेत्यांनी महत्त्वपूर्ण बाबींच्यावर सहमती दर्शवली आहे. त्याबाबत अंमलबजावणी करण्यासाठी, संवाद होणे तसंच अर्थपूर्ण संवादाची गरज आहे. त्यासाठी या मार्गातील सर्वच अडचणींवर मात करण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंधांच्या विकासाला चालना देण्यासाठी चीन भारतासोबत काम करण्यास इच्छुक आहे, असे लियु म्हणाले. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या स्थापनेच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते येथे आले होते. त्यावेळी त्यांनी ही बाब स्पष्ट केली. जागतिक शांतता निर्माण करणारा, जागतिक विकासात योगदान देणारा आणि व्यापक दृष्टीकोनातून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा रक्षक म्हणून काम करण्यासाठी शेजारी देश भारतासह सर्व संबंधितांसोबत काम करण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले.
द्विपक्षीय मुद्दा - चीन-भारत चांगले संबंध हे दोन्ही देश आणि त्यांच्या लोकांच्या हितासाठी गरजेचे आहेत. दोन्ही देशांचा समान विकास आशिया आणि जगाच्या भविष्याशी जोडलेले आहेत, असे चिनी राजदूत म्हणाले. आशियाई खेळांसाठी तीन खेळाडूंना व्हिसा नाकारल्याबद्दल विचारले असता, लियू म्हणाले की, आशियाई खेळ हा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. आम्ही कुटुंब आहोत हे यातून दिसून येते. मात्र व्हिसासंदर्भात हा द्विपक्षीय मुद्दा आहे आणि त्यासाठी चर्चा करण्या करता तुम्हाला चिनी दूतावासाशी संपर्क साधण्यासाठी आमंत्रित करतो, असे ते म्हणाले.
अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग - अरुणाचल प्रदेशातील तीन भारतीय वुशू खेळाडूंना व्हिसा नाकारण्याच्या चीनच्या निर्णयाचा निषेध म्हणून केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हांगझोऊ येथे होणारा आपला आगामी दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला खेळाडू न्यामन वांगसू, ओनिलू टेगा आणि मेपुंग लामगु यांना मान्यता नाकारण्यात आली आहे, हीच मान्यता आशियाई खेळांसाठी व्हिसा म्हणूनही काम करते. यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या नागरिकांमध्ये दिलेली वागणूक पसंत नसल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे. तसंच अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील, असेही ठणकावून सांगितले आहे.
हेही वाचा..