चेन्नई - भारतात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे पाहायला मिळालेले आहे. मात्र चैन्नईत महिला सुरक्षित आहेत की नाहीत यांची प्रचिती घेण्यासाठी आणि पोलिसांची सेवा, तत्परता पाहण्यासाठी येथील आयपीएसने चक्क मध्यरात्री सायकलवरून चैन्नई शहरात 9 किलोमीटर चक्कर मारली आहे. यावेळी त्यांनी शहरात रात्री तैनात असलेल्या पोलिसांची कार्य पद्धती आणि तत्परता पाहिली. या बाबीमुळे चैन्नईच्या महिला आयपीएस आर.व्ही. रम्या भारती या सर्वत्र चर्चेचा विषय बनल्या आहेत. त्यांचे सर्व स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.
महिला आयपीएस अधिकारी रात्रीच्या गस्तीवर सायकलवरून बाहेर पडल्या होत्या. पोलिसांची तत्परता तपासत त्यांनी आपल्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकासह दुपारी 2.45 ते 4.15 या वेळेत सायकलवरून शहरभर फिरल्या. यादरम्यान त्यांनी उत्तर चेन्नईमध्ये सुमारे 9 किमी प्रवास करून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आश्चर्यचकित केले. अधिकाऱ्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी ट्विटरवर लिहिले, “अभिनंदन रम्या भारती! तमिळनाडूमध्ये महिलांवरील हिंसाचार कमी करण्यासाठी आणि महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आदेश मी डीजीपींना दिले आहेत.
दरम्यान, शुक्रवारी चेन्नई पोलीस आयुक्तांनी रम्या भारती यांची ड्राइव अगेन्स्ट ड्रग्जसाठी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली. या अधिकाऱ्याने वालाजाह पॉइंटपासून सुरुवात केली आणि मुथुसामी ब्रिज, राजा अन्नामलाई मंदारम, एस्प्लानेड रोड, कुरलगाम, एनएससी बोस रोड, मिंट जंक्शन, वॉल टॅक्स रोड, एन्नोर हाय रोड, आरके नगर आणि थिरुवोट्टियूर हाय रोड यासह अनेक भागात त्यांनी राऊंड मारला आहे. आयपीएस रम्या भारती यांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलिसांच्या वाहनांची तपासणी केली आणि त्यांच्या भेटीची नोंदही त्यांच्या पुस्तकात केली.