गरियाबंद - छत्तीसगढ विधानसभेचे अध्यक्ष चरणदास महंत यांनी कोरोनाबाबत एक अजब विधान केले आहे. कोरोना हा लोकांना केलेल्या वाईट कर्मांच फळ आहे. याबाबत लोकांनी आत्मचिंतन केले पाहिजे, असे महंत म्हणाले. राजिम माघी पुन्नी जत्रेच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे विधान केले.
विधानसभा अध्यक्ष शनिवारी रात्री राजिम माघी पुन्नी यात्रेचे उद्घाटन करण्यासाठी राजिम पोहचले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात छत्तीसगढी संस्कृतीचे कौतूक केले. आज आपण ज्या जागतिक साथीला तोंड देत आहोत. ते केवळ आपल्या वाईट कर्मांचेच फळ आहे. त्यांमुळे लोकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. चांगले कर्म करून लोकांनी धर्माच्या मार्गाने पथक्रमन करावे आणि संस्कृतीशी जोडलेले राहावे. छत्तीसगढी संस्कृती ही देशातील समृद्ध संस्कृती आहे, असे ते म्हणाले.
नेत्यांचे अजब विधान -
मी हनुमान चालीसाचे पठण करते. मी रोज शंख फुंकते. काढा पिते. शेणाच्या गोवऱ्यांवर हवन करते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. हा माझा कोरोनापासून बचाव आहे, असे अजब विधान सांस्कृतीक व पर्यटन मंत्री उषा ठाकूर यांनी केले होते. तर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी लोकांना निरोगी राहण्यासाठी गाजर खाण्याचा सल्ला दिला होता. तसेच राजस्थानमधील खासदार सुखबीर सिंह जौनापुरिया यांनी शंख वाजवा, चिखलात बसा आणि फळांच्या पानांचा रस घ्या हा अजब सल्ला प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी दिला होता. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी कोरोनाच्या लढ्यात प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी पापड खाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. पश्चिम बंगालचे खासदार दिलीप घोष यांनी प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी गोमूत्राचा वापर करण्याचा सल्ला दिला होता.
कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा -
देशात कोरोनाचा पुन्हा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल एक कोटींचा टप्पा पार केला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात 1 मार्चपासून म्हणजेच सोमावारपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना मोफत लस देण्यात आली होती. तसेच . केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांना कोरोनाविरोधातील लस विकण्यासाठी २५० रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे कमी किमतीत ही लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.