मुझफ्फरपूर Boat Capsized in Bihar : बिहारमधील मुझफ्फरपूरमधील बेनीवाड ओपी परिसरातील मधुरपट्टी घाटावर एका बोटीचा भीषण अपघात झालाय. नदीच्या मध्यभागी बोट उलटल्यानं तीस मुलं पाण्यात पडली. मात्र, त्यातील 20 मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. इतर मुलांचा शोध अजून सुरूच आहे.
मुझफ्फरपूरमध्ये शाळकरी मुलांची बोट उलटली : बेनीवाड ओपी परिसरातील मधुरपट्टी घाटात मुलांनी भरलेली बोट अपघाताची शिकार झालीय. बोटीच्या अपघाताचे वृत्त परिसरात कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळं गावात खळबळ उडाली आहे. अपघातानंतर काही मुलांनी पोहून आपला जीव वाचवला. बोट दुर्घटनेची माहिती मिळताच, बेनियाबाद ओपी पोलिस, एसडीआरएफ, एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केलं. घटनास्थळी स्थानिक पाणबुड्यांना पाचारण करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "आम्ही मुझफ्फरपूर बोट दुर्घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पीडित कुटुंबाला मदत केली जाईल."
मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढणं पहिलं प्राधान्य : याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी प्रणव कुमार यांनी सांगितलं की, सर्व पथकं बचावकार्यात गुंतलेली आहेत. किती मुलं बुडाली याचा आकडा सांगणं कठीण आहे. 14 ते 15 जण नदीतून बाहेर आले आहेत. मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढणं आमचं पहिलं प्राधान्य आहे.
बोट किनाऱ्यावर उलटली : एसडीओ पूर्व अमित कुमार म्हणाले की, आमचं मुख्य लक्ष्य मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यावर आहे. किती जण बुडाले याबाबत अद्याप स्पष्टपणे सांगता येणार नाही. एसडीआरएफ, एनडीआरएफच्या पथकांनी बचावकार्य सुरू केलं आहे. बोट किनाऱ्यावर जवळ उलटल्यानं बरेच जण त्यातून बचावले आहेत.
नद्यांना पुरामुळं उधाण : बिहारमधील अनेक नद्यांना पुरामुळं उधाण आलंय. नेपाळमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं बागमती नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. काही काळापासून बागमती नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. मात्र, असं असतानाही मुलांनी भरलेली बोट नदीपलीकडं जात होती. बिहारमधील मुलांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत आहे.
हेही वाचा -