हैदराबाद - लोकसभा निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास भाजपविरहित सरकार स्थापन करण्यासाठी चंद्राबाबूंनी पुढाकार घेतला होता. मात्र, चंद्राबाबूंना विधानसभा निवडणुकीत धक्का बसला आहे. त्यांचा टीडीपी पक्ष पिछाडीवर पडला असून वायएसआर काँग्रेस १०६ जागांवर विजयी झाला असून ४२ जागांवर पुढे आहे. टीडीपी पक्षाचा पराभव झाल्याने आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला.
आंध्र प्रदेशातील १७५ जागांवर मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीला आलेल्या आकडेवारीनुसार आंध्रात चंद्राबाबूंच्या पक्षाचा धुव्वा उडाला. सत्तेत असलेल्या टीडीपीला आपला यश मिळताना दिसत नाही.
निकालाच्या आधी आलेल्या एग्झिट पोलने सर्वांची उत्सुकता वाढवली होती. आंध्र प्रदेशच्या निकालासंदर्भात वेगवेगळ्या शक्यती वर्तवण्यात आल्या होत्या. सध्या असणारी परिस्थती अशीच राहिल्यास आंध्रप्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेस सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.
आंध्रप्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आलेले अपयश, काँग्रेससोबत आघाडी न करणे यामुळे चंद्राबाबूंना हा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी पक्ष फक्त १७ जागांवर विजयी झाला असून ९ जागांवर आघाडीवर आहे.