इम्फाळ- मणिपूरमधील कामजोंग जिल्ह्यातील कासोम खुलेन येथे भारत-म्यानमार सीमेजवळ अतिरेक्यांच्या शोधात निघालेल्या आसाम रायफलच्या जवानांचा रस्ता महिलांनी अडवल्याने तणाव निर्माण झाला. याप्रसंगी महिला मोठ्या प्रमाणात जमा झाल्या होत्या.
कासोम खुलेन येथील बंगडंग येथे अतिरेकी असल्याची माहिती आसामा रायफलच्या जवानांना मिळाली होती. त्यानुसार ते कारवाई करण्यासाठी गेले होते. स्थानिक माध्यमांनी दिेलेल्या वृत्तानुसार महिलांनी रस्ता अडवला होता. जवानांनी माघारी जावे यासाठी त्या निदर्शने करत होत्या. यावेळी आसाम रायफलचे जवान निदर्शने थांबण्याची वाट पाहत गावाबाहेर थांबले होते.
कोरोनामुळे मानसिक तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच गावामध्ये मोठ्या संख्येने जवानांनी येऊ नये, अशी मागणी त्या महिला करत होत्या. याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे.
परिस्थिती तणावग्रस्त असली तरी आम्ही सामान्य नागरिकांनी हानी पोहचेल अशी कोणतिही कारवाई करणार नसल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. एनएससीएन(आयएम) या संघटनेचा या परिसरात कॅम्प उभारण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळाल्यामुळे येथे अतिरिक्त जवान तैनात करण्यात येणार आहेत, असे अधिकारी म्हणाले.
लॉकडाऊन असो वा नसो अतिरेक्यांच्या बेकायदेशीर कामांना पायबंद घालणे आमचे कर्तव्य आहे. कोरोनामुळे नागरिक चिंतेत आहेत हे आम्हाला मान्य आहे. मात्र, ते यामुळे आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापासून ते आम्हाला रोखू शकत नाहीत. गावामध्ये अतिरेकी असल्याच्या माहितीची शहानिशा केल्यानंतर जवानांची संख्या वाढवल्याचे सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले. जिल्हा प्रशासनाची या घटनेबद्दलची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.