नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे जागतिक आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर एचआयव्ही रुग्णांवरील उपचार आणि एड्स प्रतिबंध कार्यक्रमांना खिळ बसली असून जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण पूर्व आशिया खंडांतील देशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. एचआयव्ही रुग्णांच्या चाचण्या आणि उपचाराची यंत्रणा मंद गतीने कार्यरत असून त्यामुळे रुग्णांवर गंभीर परिणाम होणार असल्याचा सावधानतेचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. एचआयव्हीसह अनेक देशांत पोलीओ लसीकरण कार्यक्रमही खोळंबून पडला आहे.
आशियासाठी धोक्याची घंटा
कोरोना महामारीचा जगात फैलाव झाल्यानंतर अमेरिकेसह अनेक प्रगत देशांतील आरोग्य सुविधा कोलमडून पडली आहे. त्यामुळे एड्स बाधित रुग्णांची चाचणी, उपचार आणि त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा मंदावल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. अनेक देशांतीत जनता एड्सच्या संकटात लोटली गेली आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया विभागाच्या क्षेत्रीय संचालिका डॉ. पुनम खेत्रपाल यांनी हा इशारा दिला आहे. आशिया खंडातील देशांच्या आरोग्य यंत्रणांसाठी ही धोक्याची घंटा असून याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
कोरोनामुळे एड्सविरोधी लढाई मंदावली
२०१९ साली जगभरातील सुमारे ३ कोटी ८० लाख नागरिक एचआयव्ही बाधित असल्याचे समोर आले आहे. यातील सुमारे ३७ लाख नागरिक दक्षिण पूर्व आशिया विभागातील आहेत. मागील काही वर्षात एड्सचा संसर्ग कमी झाल्याचेही खेत्रपाल म्हणाल्या. मात्र, २०२० साली एड्स कमी करण्याबाबतचे उद्दिष्टांपासून आपण दुर असल्याचे खंतही त्यांनी व्यक्त केली.
२०१० ते २०१९ या दहा वर्षांच्या काळात दक्षिण पूर्व आशियाने एड्स विरोधात मोठी लढाई लढली आहे. नवे रुग्ण आणि मृत्यूंची संख्या कमी झाली आहे. मात्र, आता कोरोना संकटामुळे एड्स विरोधातील काम कमी होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.