जयपूर : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नसबंदी शस्त्रक्रिया झालेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यात असणाऱ्या सूरतगढमधील एका नसबंदी शिबिरामध्ये घडली. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाकी कमी महत्त्वाच्या शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या असतानाही हे शिबीर घेण्याची गरजच काय होती? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
या घटनेनंतर आरोग्यविभागाने जिल्ह्यातील अशा सर्व शिबिरांना स्थगिती दिली आहे. तसेच, जिल्हाधिकारी महावीर प्रसाद वर्मा यांनी याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले आहे. या समितीमध्ये चार डॉक्टरांचा समावेश असणार आहे.
दरम्यान, सूरतगढचे शल्यविशारद डॉ. दर्शन सिंह यांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
हेही वाचा : ..आता महाराष्ट्रातून कर्नाटकात परतणाऱ्या नागरिकांना 'इतके' दिवस राहावे लागणार होम क्वारंटाईन