श्रीनगर - टिकटॉक हे शॉर्ट व्हिडिओ मनोरंजन अॅप भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते. देशभरात अनेक टिकटॉक स्टारही उदयाला आले होते. मात्र, भारत-चीन सीमावाद चिघळल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करत भारत सरकारने टिकटॉकसह अनेक चिनी अॅप्सवर बंदी घातली. काश्मीरमधील दोन भावांनी टिकटॉकला पर्यायी न्युकूलर नावाचे शार्ट व्हिडिओ अॅप तयार केले आहे.
काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील दोन भावांनी हे अॅप तयार केले आहे. हे अॅप मोबाईल पोर्टेबल असून गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले आहे. मोहम्मद फारुक वाणी आणि त्याचा लहान भाऊ टीपू सुलतान वाणी या दोघा भावांनी हे अॅप तयार केले आहे. मोहम्मद हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तर टीपू हा एमबीए झाला असून त्याने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा डिप्लोमा केला आहे.
याआधी दोघा भावांनी 'डॉक्यूमेंट स्कॅनर' आणि 'फाईल शेअर इट' ही चिनी अॅपला पर्यायी भारतीय बनावटीची अॅप बनवली आहे. गलवान वादानंतर भारत सरकारने चिनी बनावटीची सुमारे २२४ अॅपवर बंदी घातली आहे.
टिकटॉक हे शार्ट व्हिडिओ अॅप भारतात प्रचंड लोकप्रिय होते. युवा वर्गामध्ये विशेषत: त्याची लोकप्रियता जास्त होती. भारतात टीकटॉक बंद झाल्यानंतर अनेकांनी अवैधरित्या अॅप डाऊनलोड करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, आता भारतीय अॅप बाजारात आले आहे. 'चिंगारी' हे शार्ट व्हिडिओ अॅप बाजारात आल्यानंतर आता न्युकूलर हे अॅपही गुगल स्टोअरवर उपलब्ध झाले आहे.