नवी दिल्ली - दिल्लीच्या जंतर-मंतरवर मोठ्या संख्येने तिबेटी लोकांनी चीनविरोधात निदर्शने केली. चीनने तिबेटी धर्मगुरू पंचेम लामा गेडन चौकी नईमा यांचे १७ मे १९९५ रोजी अपहरण केले होते, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या सुटकेसाठी हे लोक जंतर-मंतर येथे एकत्र आले होते. येथे अनेकजण पंचेम लामा यांच्या आठवणीने रडू लागले. त्यांनी चीनला दोष देत चीनी अत्याचारांचा पाढा वाचला.
२४ वर्षांपासून अत्याचार करत आहे चीन
'२४ वर्षांपासून आम्ही सर्व लोक चीनी अत्याचारांच्या विरोधात लढत आहेत. पंचेम लामा यांना चीनच्या तावडीतून बाहेर काढण्यात भारत सरकारने आम्हाला मदत करावी, अशी आमची विनंती आहे. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्यानंतर पंचेम लामा हेच तिबेटींचे सर्वांत मोठे गुरु आहेत. त्यांनाच दुसऱ्या दलाई लामांची निवड करण्याचा अधिकार आहे. या कारणानेच चीनने त्यांना कैदेत ठेवले आहे. कारण यानंतर कोणीही तिबेटीयन धर्मगुरु बनू नये, अशी चीनची इच्छा आहे,' असे समकी या निदर्शकाने म्हटले आहे.
तिबेटी महिलांनी मुलांना जन्म देऊ नये असा चीनचा प्रयत्न
'इतक्या वर्षांत आमच्या धर्मगुरुंचा पत्ता नाही. ते जिवंत आहेत की नाहीत, हे कळायला मार्ग नाही. या काळात चीनने आमच्यावर अनेक अत्याचार केले. तिबेटी महिलांनी मुलांना जन्म देऊ नये, अशी चीनची इच्छा आहे. यासाठी तिबेटी महिलांनी जबरदस्तीने चीनी युवकांशी संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते. यामुळे होणारे मूल तिबेटी न म्हणवले जाता चीनी म्हणवले जावे. अशा प्रकारे तिबेटी वंश संपवला जावा, असा चीनचा प्रयत्न आहे,' असे समकी यांनी सांगितले.