नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे असलेले संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मात्र, काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे दोघे या अधिवेशनाला मुकणार आहेत. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींच्या वार्षिक वैद्यकीय उपचारांसाठी हे दोघे परदेशी गेले आहेत. दोन आठवड्यांनंतरच सोनिया गांधी देशात परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राहुल गांधी लवकर परतणार..
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी म्हणून, पुढील दोन दिवसांमध्ये राहुल गांधी परत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यासोबत राहुल गांधी परतणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच गांधी कुटुंबीयांची गैरहजेरी लागणार असल्यामुळे, पक्षातील काही वरिष्ठ नेते महत्त्वाचे विषय संसदेत मांडतील. भारत-चीन सीमावाद, दोन्ही लष्करांमधील झटापट, अर्थव्यवस्था, कोरोना परिस्थिती हाताळणी आणि जेईई-नीट परीक्षा असे काही महत्त्वाचे विषय मांडण्यासाठी वरिष्ठांना सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : सरकारच्या चांगल्या नियोजनाने देशाचा जीडीपी गेला रसातळाला; राहुल गांधींची उपरोधिक टीका