लखनऊ - अयोध्या राम मंदिर आणि बाबरी मशीद वादाप्रकरणी काही आठवड्यात सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे. त्यामुळे अयोध्या शहरातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दिवाळी आणि अयोध्या खटल्याचा निकाल या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू केली आहे.
शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांकडून नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. सध्या शहरातील वातावरण शांततापूर्ण आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे, तसेच जर कोणी अफवा पसरवताना आढळून आला तर पोलिसांना त्वरित माहिती द्या, असे आवाहन मंडळ अधिकारी अमन सिंह यांनी नागरिकांना केले आहे.
हेही वाचा - अयोध्या वाद : मुस्लीम पक्षाच्या वकीलांनी न्यायालयात फाडलेला नकाशा कोणत्या पुस्तकातील?
जिल्हा न्यायालयाने शहरामध्ये १० डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू केले आहे. याबाबतचा आदेश जिल्हा न्यायाधीश अनुज कुमार झा यांनी दिला आहे. दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवरही संचारबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे झा यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या जमीन वादाप्रकरणी नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण केली आहे. ४० दिवसांच्या या सुनावणीत हिंदू आणि मुस्लीम पक्षाची बाजू न्यायालयाने एकून घेतली. याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मावळते सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले. गोगोई १७ ऑक्टोबरला निवृत्त होणार असून त्याआधी याप्रकरणी निर्णय लागण्याची शक्यता आहे. न्यायालयाने निकाल लिहिण्यासाठी वेळ राखून ठेवला आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये या वादाप्रकरणी निर्णय होणार आहे.
हेही वाचा - 'अयोध्या वाद प्रकरणाच्या सुनावणीवर कोणतेही अंदाज व्यक्त करू नका'