अहमदाबाद - साबरमती नदी ते केवडिया येथील युनिटी ऑफ स्टॅच्यु मार्गावर सी-प्लेन सेवा सुरू होणार आहे. या सी-प्लेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ३१ ऑक्टोबरला 'राष्ट्रीय एकता दिन'ला होणार आहे. या सी-प्लेनचे उड्डाण अहमदाबादच्या नदीवरून ३१ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता होणार आहे.
सी-प्लेन हे अहमदाबाद ते केवडिया हे २२० किमीचे अंतर केवळ ४५ मिनिटात पार करणार आहे. त्यामध्ये १९ जणांना बसण्याची क्षमता आहे. हे सी-प्लेन ३०० मीटरच्या धावपट्टीवर उड्डाण घेऊ शकते.
सुरुवातीच्या टप्प्यात ५ क्रू मेंबरसह केवळ १४ जणांना बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सी-प्लेनची दररोज अहमदाबाद ते केवडिया या मार्गावर ८ उड्डाणे होणार आहेत. या सी-प्लॅनचे ४ हजार ८०० रुपये तिकीट आहे. विदेशी तज्ज्ञांकडून भारतीय वैमानिकांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सी-प्लेनद्वारे वाहतूक हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.