नवी दिल्ली - शहराच्या मुखर्जी नगरमधील विजयनगर परिसरात रविवारी संतापजनक घटना घडली. एका मणिपूरी तरुणीला 'कोरोना' म्हणत, तिच्या अंगावर गुटखा थुंकून स्कूटरचालक फरार झाला. यानंतर या तरुणीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेणे सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूरची ही तरुणी दिल्लीच्या विजयनगर परिसरात भाड्याने राहत आहे. रविवारी रात्री ती पायी चालत आपल्या घरी जात होती. यादरम्यान विजयनगरमध्ये असताना, स्कूटीवर असणारी एक व्यक्ती तिच्या शेजारी आली. त्यानंतर त्या व्यक्तीने तरुणीवर गुटखा थुंकला. त्या तरुणीला काही समजण्यापूर्वीच तिला 'कोरोना' म्हणून हा व्यक्ती पसार झाला. तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर आता आजूबाजूच्या सीसीटीव्हींच्या मदतीने पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
'नॉर्थ-इस्ट'च्या लोकांमध्ये संताप..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ईशान्य भारतातील लोकांना सोशल बॉयकॉटिंगला सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता या घटनेनंतर ईशान्य भारतातील लोक चांगलेच संतापले आहेत. या तरुणीचा फोटो समाजमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यानंतर ईशान्य भारतातील काही नागरिकांनीही याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या आरोपीला आम्ही लवकरच अटक करू, असे पोलिसांनी म्हटले आहे.
हेही वाचा : #CORONAVIRUS : इटलीतील स्थिती सांगतोय मराठी तरुण...याची देही, याची डोळा