नवी दिल्ली - राजस्थानमध्ये गेहलोत सरकार अडचणीत आले आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी ३० आमदारांसह दिल्ली गाठली असून ते भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यातच आता सचिन पायलट यांनी भाजप प्रवेश केला आहे, असे वक्तव्य छत्तीसगढमधील काँग्रेसचे प्रभारी पी.एल पुनिया यांनी व्यक्त केले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्यांनी त्यांची चूक सुधारून मला पायलट नाही तर सिंधिंया यांच्या बद्दल बोलायचे होते, असे स्पष्टीकरण दिले आहे.
सचिन पायलट यांची काँग्रेसमध्ये उपेक्षा होत आहे, असे ट्विट भाजपवासी झालेल्या ज्योतिरादित्य सिंधिंया यांनी केले होते. त्यावर बोलताना त्यांनी 'सचिन पायलट आता भाजपमध्ये गेले आहेत, भाजपमध्ये कशा प्रकारे राजकारण चालते, त्यांचा काँग्रेसबाबत कोणता दृष्टीकोण आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आता कोणत्या प्रमाणपत्राची गरज नाही. काँग्रेसमध्ये सर्व नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो', असे मत त्यांनी व्यक्त केले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे सचिन पायलट यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नसल्याने अनेकामध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
त्यानंतर पुनिया यांनी तत्काळ या वक्तव्याची दुरुस्ती केली आहे, ते म्हणाले की मला सिंधिंया यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता. मात्र माझी जीभ घसरल्याने चुकीने मी सचिन पायलट यांचे नाव घेतले.
राजस्थानच्या या राजकीय आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रसेन आज सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत काँग्रेसकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. त्यावर आता कोणकोकणते आमदार बैठकीला उपस्थित राहतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.