कानपूर - संपूर्ण देश कोरोनासारख्या महामारीचा सामना करत आहे. अशात या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पोलीस आणि सरकार नागरिकांना वारंवार घरातच राहण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, नागरिक सर्रास या सूचनांचे उल्लंघन करत आहेत. अशीच घटना कानपूरमध्ये घडली.
एका मोठ्या हॉटेलचा मालक अचानक रात्री उशीरा आपली कार घेऊन हरबंसमोहाल ठाणा क्षेत्रातील रस्त्यावर फिरु लागला. नंतर तो आपली कार महामार्गावर घेऊन गेला. गाडीचा वेग इतका होता, की हॉटेल मालक सुरेश चंद्र मिश्राने एका तरुणाला धडक दिली. यात अरुण कुमार तोमर हा तरुण जखमी झाला. यानंतरही गाडी थांबली नाही.
पुढे जात या गाडीने एका गाईला धडक दिली. यानंतर घंटाघर मस्जिदशेजारील दुकानांना ही गाडी धडकली. यादरम्यान आणखी एक वृद्ध गाडीच्या धडकेत जखमी झाला. मनीष ओमर असे या वृद्धाचे नाव आहे. या घटनेत वृद्धाच्या डोक्याला बराच मार लागल्याने त्यांना हैलट रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, याप्रकरणी सुरेंद्र कुमार मिश्राला पोलिसांनी ताब्यात घेतले.