जयपूर (राजस्थान) - काँग्रेस पक्षाने आज (मंगळवारी) पुन्हा आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता जयपूर-दिल्ली राष्ट्री राजमार्गवरील फेयरमाऊंट या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील सरकारला समर्थन देणाऱ्या आमदारांना ठेवण्यात आले आहे.
राजस्थानात सुरू असलेल्या सत्तासंघर्षादरम्यान, तिसऱ्यांदा ही बैठक बोलावण्यात आली आहे. याआधी सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ही बैठक होणार होती. मात्र, काही कारणांमुळे ही बैठक रद्द करण्यात आली. यानंतर बैठकीची वेळ बदलून आज (मंगळवारी) सकाळी 11 वाजता करण्यात आली आहे. बैठकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत आपल्या आमदारांसह भविष्यातील रणनीतीबाबत चर्चा करणार आहेत. तसेच या बैठकीला काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
राजस्थानातील गेहलोत सरकार पाडण्यासाठी प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी या बैठकीत सहभागी होण्यासाठी नकार दिला होता. यानंतर काँग्रेसने 13 आणि 14 जुलैला आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती. 13 जुलैला मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर आमदारांना हॉटेल फेयमाऊंट येथे ठेवण्यात आले होते. यानंतर या हॉटेलमध्ये 14 जुलैला पुन्हा आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती.
आजच्या या बैठकीत विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून बहुमत आजमावण्याबाबत चर्चा होऊ शकते. तर, सूत्रांनुसार, मुख्यमंत्री गेहलोत यांच्या सरकारजवळ बहुमत आहे. तथापि, बिकानेरच्या श्रीडूंगरगढ येथील माकपा आमदार गिरधारी महिया हे गेहलोत गटात सहभागी होतील की, नाही याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.