नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी एका गावात सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा मंगळवारी सकाळी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात संताप आणि निषेध व्यक्त करण्यात आला. या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
तिच्या मृत्यूची बातमी पसरताच दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालय परिसर तसेच, हाथरस येथील विजय चौकात नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते यांनी तिला न्याय मिळावा, अशी मागणी केली. या निषेधाचे नेतृत्व भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केले. त्यांनी दलित समाजातील सर्व सदस्यांसह रस्त्यावर उतरत दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.
'आमच्या बहिणीच्या मृत्यूला राज्य सरकारही तितकेच जबाबदार आहे. आम्ही दोषींना फाशीच्या शिक्षेची मागणी करतो. सरकारने आमच्या धैर्याची परीक्षा घेऊ नये. दोषींना फाशी होईपर्यंत आम्ही विश्रांती घेणार नाही,' असे आझाद म्हणाले. आझाद यांनी यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने त्या तरुणीला चांगल्या उपचारासाठी एम्समध्ये हलविण्याची मागणी केली होती.
हेही वाचा - युपी सामूहिक अत्याचार पीडितेची मृत्यूशी झुंज अयशस्वी; दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
पंधरा दिवसांपूर्वी या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिने बलात्काराच्या प्रयत्नाला विरोध केला म्हणून आरोपींनी तिची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि यादरम्यान तिने स्वतःच्याच जिभेला जोरदार चावा घेतल्यामुळे तिची जीभ तुटून ती गंभीररीत्या जखमी झाली होती. या प्रकरणात तिच्यावर बलात्कार करणाऱ्या चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी २० वर्षीय आरोपी संदीप याला या १९ वर्षीय तरुणीला ठार मारण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. बलात्कार झालेल्या दिवशीच त्याला पकडण्यात आले होते, असे हाथरस येथील पोलीस अधीक्षकांनी सांगितले. यानंतर न्यायाधीशांना दिलेल्या जबाबात संदीपशिवाय रामू, लवकुश आणि रवी यांनीही तिच्यावर बलात्कार केला होता, असे या तरुणीने सांगितले होते. आतापर्यंत या चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - अंगातील भूत काढण्यासाठी मांत्रिकाची मारहाण; तीन वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू