हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज हैदराबादेतील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अॅकॅडमीतील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आज १३१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयपीएस अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी काश्मीरातील दहशतवादावर वक्तव्य केले. 'काश्मीरातील तरुणांना चुकीच्या वाटेवर जाण्यापासून रोखण्याची गरज आहे. जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच त्यांना रोखण्याची गरज आहे. महिला पोलीस कर्मचारी स्थानिक महिलांशी संपर्क वाढवून परिस्थितीत बदल घडवून आणू शकतात', असे मोदी म्हणाले.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा सामना करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. खाकी वर्दीतील मानवी चेहरा कोरोना काळात चांगले काम केल्यामुळे जनतेच्या मनात कोरला गेला आहे. पोलिसांनी वर्दीची ताकद दाखविण्यापेक्षा वर्दीचा अभिमान बाळगायला हवा. खाकीचा आदर कधीही विसरू नका, असे मोदी म्हणाले.
प्रोबेशनरी आयपीएस अधिकाऱ्यांशी बोलताना पंतप्रधान म्हणाले, 'कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे प्रसंग तुमच्या करिअरमध्ये जास्त येतात. त्यासाठी तुम्ही सर्वांनी सतर्क आणि तयार असले पाहिजे. पोलीस म्हणून काम करताना तणावही जास्त असतो, त्यामुळे तुमच्या जवळचे आणि प्रियजनांशी कायम व्यक्त होत राहा. सुट्टीच्या दिवशी किंवा इतर वेळी तुमचे शिक्षक किंवा इतरांशी वेळोवेळी बोलत राहा'.
तणाव कमी करण्यासाठी मोदींनी योगाचे महत्त्व सांगितले. तणावात काम करणाऱ्यांसाठी योगा आणि प्राणायम गरजेचे आहे. मनापासून तुम्ही कोणतेही काम केल्याचा तुम्हाला त्याचा फायदाच होईल आणि तणावही येणार नाही, असे मोदी म्हणाले. २८ महिलांसह १३१ आयपीएस प्रशिक्षणार्थींनी ४२ आठवड्याचे पहिले प्रशिक्षण पूर्ण केले. प्राथमिक प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्यांना कायदे, तपास, फॉरेन्सिक, नेतृत्त्व गुण, व्यवस्थापन, मानवी हक्क, गुन्हे विषयक अभ्यास, कायदा सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा याबाबत प्रशिक्षण दिले जाते.