नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर बुद्ध पौर्णिमेनिमित्त आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेच्या सहकार्यातून सांस्कृतिक मंत्रालयात आज कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी टि्वट करून दिली आहे.
जगभरातील बौद्ध संघांच्या प्रमुखांसह एका अभासी (व्हर्च्युअल) प्रार्थना कार्यक्रम आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेच्या सहकार्यातून सांस्कृतिक मंत्रालयात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम कोरोनापीडित आणि कोरोना विरोधात लढणाऱ्या सैनिकांच्या सन्मानार्थ आयोजीत केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी देशाला संबोधीतही करणार आहेत.
या कार्यक्रमात बिहारमधील बोधगयाचे महाबोधी मंदिर, सारनाथमधील मूलगंधा कुटी विहार, नेपाळमधील पवित्र लुंबिनी गार्डन, कुशीनगरमधील परिनिर्वाण स्तूप या ठिकाणांहूनही थेट प्रक्षेपण होणार आहे.
बुद्ध हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात.