नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी आज मध्यरात्रीपासून २१ दिवस संपूर्ण भारत बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण देश आता घरामध्ये बंद राहणार आहे. कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असून जर परिस्थिती आत्ताच नियंत्रणात आणली नाही तर अनर्थ ओढवेल, असा इशारा मोदींनी दिला आहे.
पुढील २१ दिवस जर आपल्याला परिस्थिती नियंत्रणात आणता आली नाही तर आपण २१ वर्षे मागे ढकलले जावू आणि हे सर्वांना लागू आहे. पंतप्रधानांना सुद्धा. नागरिकांना घरातून बाहेर निघण्यास पूर्णत: बंदी असेल. तीन आठवडे ही लक्ष्मण रेषा म्हणजेच घराचा दरवाजा ओलांडू नका, असे मोदी म्हणाले.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे मोदींचे आवाहन
अशा काळात काही वेळा अफवा देखील मोठ्या प्रमाणात पसरत असतात, त्यापासून तुम्ही दूर राहा. अफवांवर विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला विनंती करतो की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. मला विश्वास आहे की प्रत्येक भारतीय नागरिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करेल. २१ दिवसांचा लॉकडाऊन मोठा काळ आहे, मात्र तुमच्या आरोग्यासाठी, जीवाच्या रक्षणासाठी फार आवश्यक आहे. आपण या संकटाचा मुकाबला करुच आणि त्याच्यातून यशस्वीपणे बाहेर पडू, असे मोदी म्हणाले.