नवी दिल्ली - केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला जाणार आहे. केंद्रिय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. राज्य सरकारदेखील केंद्राच्या अर्थसंकल्पाकडे डोळे लाऊन बसलेले असतात. यावेळचा अर्थसंकल्प काहीसा वेगळा असणार असल्याचा कयासही लावला जात आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी काही खास घोषणा होण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे.
अरुण जेटली आजारी असल्याने पीयूष गोयल हा अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अंतरिम अर्थसंकल्पास ‘लेखानुदान’ असेही म्हटले जाते. या अर्थसंकल्पात अनेक महत्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे.
सादर होणारा हा अर्थसंकल्प पूर्ण स्वरुपाचा नसून वोट ऑन अकाउंट स्वरुपाचा असेल. याचा अर्थ निवडणुकीपूर्वी सरकारचे कामकाज चालू ठेवण्यासाठी काही महिन्यांकरिता सादर केला जाणारा अंतरिम अर्थसंकल्प असेल.
या अर्थसंकल्पात शेतीच्या समस्या दूर करण्यासोबतच मध्यमवर्गीयांना करातून सवलत देण्याच्या प्रयत्नही केला जाण्याची शक्यता आहे. आता सरकारसमोर आगामी लोकसभा निवडणुकीचे आव्हान आहे. त्यामुळे शेतकरी आणि मोठ्या संख्येने असणाऱ्या मध्यमवर्गीयांना खूश करण्याचा प्रयत्नही या अर्थसंकल्पातून होऊ शकतो.
जेटलींचे संकेत
यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारतर्फे अनेक मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात. पण, अंतरिम अर्थसंकल्पाच्या मर्यादांमुळे तसे होणे शक्य नाही. अर्थमंत्री जेटली यांनी असे संकेत दिले आहे की, सरकार अर्थव्यवस्थेच्या तात्कालिन आव्हानांना समोरे जाण्यासाठी काही महत्वाचे पाऊल उचलू शकते. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की यावेळी अर्थसंकल्पात कृषी समस्या आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यांसारखे मुद्दे बजेटमध्ये प्रामुख्याने सामिल असू शकतात.