नवी दिल्ली - मागील चार महिन्यांपासून लडाखमधील भारत-चीन सीमेवर तणाव सुरू आहे. गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीनंतर सीमेवर पुन्हा आता नव्याने तणाव निर्माण झाला आहे. चीनने भारतीय भूमीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय लष्कराने चिनीचा प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर दोन्ही देशांचे सैन्य सतर्क झाले असून रणगाडेही फायरिंग रेंजमध्ये आहेत. दरम्यान, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी सीमेवरील संवेदशील परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
29 आणि 30 ऑगस्टला चीनकडून घुसखोरीचे प्रयत्न -
दोन्ही देशांमध्ये सीमावादा संबंधी लष्करी कमांडर स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र, चीनच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे चर्चेचे घोंगडे भिजत पडले आहे. सीमारेषेवरील वादावर अंतिम तोडगा निघाला नसतानाही 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री पूर्व लडाखमधील पँगाँग लेकच्या दक्षिणेस चिनी सैन्याच्या हालचाली अचानक वाढल्या होत्या. सीमेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न चिनी लष्कराने केला. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. चीनने आता भारतानेच घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा - चीनच्या राजदूत कार्यालयाकडून भारतावरच पँगाँग त्सो घुसखोरी केल्याचा आरोप
संरक्षण मंत्रीही घेणार उच्चस्तरीय बैठक
चीनबरोबरचा तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. यामध्ये लष्कराचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होण्याची शक्यता आहे. भारताच्या पुढील रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ब्रिगेड कमांडर स्तरावरील चर्चा भारत आणि चीनच्या लष्करात चुशूल माल्डो येथे सुरू आहे. पँगोंग सरोवराच्या दक्षिण भागातील स्थितीवर अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. ऑगस्ट २९/३० च्या रात्री चिनी सैनिकांनी आधीच्या बैठकीत ठरलेल्या मुद्द्यांचे उल्लंघन करत भारतीय भूमीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून सीमेवरील वातावरण तणावपूर्ण असल्याने भारतीय लष्करही सज्ज आहे. भारताने भू तसेच समुद्र सीमांवरही चीनची नाकेबंदी करण्याची तयारी केली आहे. दक्षिण चीन समुद्रातही भारताने आपली युद्धनौका पाठवली आहे.
हेही वाचा - चीनच्या विश्वासघातकी धोरणावर भारत हुशारीने मात करू शकेल?