श्रीनगर : काश्मीरच्या माचिल भागामध्ये सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या एका दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी ठार केले. रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. यासोबतच या कारवाईदरम्यान बीएसएफचा एक जवान हुतात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माचिल भागात पेट्रोलिंग करत असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांना याठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे दिसले. त्यांनी पाहणी केली असता सीमेपलीकडून काही दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजले. यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याचा खात्मा केला. रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
रायफल जप्त; सर्च ऑपरेशन सुरू..
चकमकीनंतर घटनास्थळावरुन एक एके रायफल आणि दोन बॅग जप्त करण्यात आले आहेत. संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी याबाबत माहिती दिली. तसेच, या घटनेनंतर परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
मागील आठवड्यातही एकाचा खात्मा..
मागील गुरुवारी काही दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये केलेल्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. यानंतर सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले होते.
हेही वाचा : "मित्रोंsss...!" नोटाबंदीला आज झाली 4 वर्षं...