नवी दिल्ली - ऑनलाईन वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या मेडलाईफ या कंपनीने इतर प्रमाणीत लॅबचे सहकार्य घेत घरीच कोरोना चाचणी घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा काही ठराविक शहरांमध्ये उपलब्ध असून लवकरच कंपनी इतर शहरांमध्ये सेवेचा विस्तार करणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
कोरोना चाचणीची किंमत 4 हजार 500 रुपये ठेवण्यात आली आहे. तर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने प्रमाणित केलेल्या लॅबद्वारे या चाचण्या घेण्यात येणार आहेत, असे मेडलाईफने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. सर्व चाचण्या रिअल टाईम पीसीआर तंत्रज्ञान वापरून करण्यात येणार आहेत.
कोणकोणत्या शहरात सुविधा उपलब्ध
सध्या कोरोना चाचणी मुंबई, दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या प्रदेशातील नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद येथे सुरु आहे. तर हरयाणातील गुरगाव आणि पुण्यातही लवकरच ऑनलाईन चाचणीसाठीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
मेडलाईफने ऑनलाईन वैद्यकीय कन्सलटेशन(सल्ला) ची सुविधाही सुरु केली आहे. यासाठी 1 हजार 500 डॉक्टर सेवेसाठी जोडले गेले आहेत. कोरोनाच्या चाचण्या जलद घेण्यासाठी आम्ही आयसीएमआरशी सहकार्य केले आहे. देशातील कोरोनाचा प्रसार तपासण्यासाठी शक्यती पावले आम्ही उचलत आहोत, असे मेडलाईफचे सहसंस्थापक आणि सीईओ अनंत नारायणन यांनी सांगितले.