नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनआसरी) कायद्यांवरून दंगल पेटली होती. या जातीय दंगलीत अनेकांची हत्या करण्यात आली होती. शहरातील शिवविहार भागात कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याच्या मारेकऱ्याला पकडण्यात सात महिन्यांनंतर यश आले आहे.
उत्तर-पूर्व दिल्लीत २४ फेब्रुवारीला जातीय दंगल उसळली होती. यात राहुल सोलंकी नावाच्या तरुणाची राजधानी पब्लिक स्कूल येथे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुस्तकीम ऊर्फ समीर (२५) यास अटक करण्यात आली आहे. तो दिल्लीतील मुस्तफाबाद परिसरातील रहिवासी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तुल जप्त केले आहे. दिल्ली पोलिसांनी राहुलच्या मारेकऱ्याला अटक करण्यासाठी १ लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते. मात्र, आरोपीचा शोध लागत नव्हता.
मागील सहा महिन्यांपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, मुस्तफाबादला राहणाऱ्या मुस्तकीम याने राहुल सोलंकीची हत्या केली असावी, अशी माहिती सूत्रांकडून पोलिसांना मिळाली होती. तसेच घटना स्थळावरील व्हिडीओ फुटेजमधील व्यक्ती आणि मुस्तकिम यांच्यात पोलिसांना साम्य दिसून आले होते. त्यानंतर त्याला भजनपूरा मझार येथून अटक करण्यात आली, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
मुस्तकीम याने सीसीए-एनआरसी विरोधी फारुकीया मशिद येथे झालेल्या आंदोलनात सहभाग घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. २४ फेब्रुवारीला राहुलला महालक्ष्मी एनक्लेव्ह येथे गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. जीबीटी रुग्णालयात त्याला मृत अवस्थेत दाखल करण्यात आले होते.
आरोपी विरोधात दयालपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, नंतर ही केस विशेष तपास पथकाकडे सोपविण्यात आली होती. गुन्हा घडला त्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले.