कोलकाता - तृणमूल काँग्रेस पक्षाद्वारे 'शहीद दिवसा'निमित्त धरमताला येथे रॅली काढण्यात येत आहे. या रॅलीला मुख्यंमत्री ममता बॅनर्जी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला. ममता बॅनर्जी २०२१ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाचा अजेंडा घोषित करण्याची शक्यता आहे.
१९९३ साली ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात १३ जण मृत्युमुखी पडले होते. तेव्हापासून तृणमूल काँग्रेस पक्षाद्वारे हा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. यावेळी आंदोलनातील मृतांना श्रद्धांजली वाहिली जाते. या रॅलीला राज्यभरातून तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आले आहेत.
सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या मदतीने घोटाळा करुन भाजपने राज्यात लोकसभेच्या जागा जिंकल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पंचायत राज आणि पालिकांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची विनंती निवडणूक आयोगाला करणार असल्याचे त्या म्हणाल्या.