नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) केरळमध्ये एका व्यक्तीला आत्मघातकी हल्ल्याचा कट रचण्याच्या आरोपावरून अटक केली आहे. रियास ए उर्फ रियास अबू बकर उर्फ अबू दुजाना असे या २९ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. तो पलक्कड येथील रहिवासी आहे. तो श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड जहरान हाशिम याचा अनुयायी असल्याचे सांगण्यात आले आहे.
त्याच्या चौकशीदरम्यान अनेक बाबींचा खुलासा झाला. रियास एक वर्षाहून अधिक काळ हाशिमची भाषणे आणि व्हिडिओ यांना 'फॉलो' करत होता. तसेच, वादग्रस्त मुस्लीम प्रचारक जाकिर नाइक याचीही भाषणे तो ऐकत असे. त्यानेही आत्मघातकी हल्ला घडवून आणण्याचा विचार केला होता. त्याला बुधवारी कोचीन येथील एनआयएच्या न्यायालयात सादर केले जाणार आहे.