लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बिकौनगंजमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. मास्क घातला नाही म्हणून कानपूर पोलिसांनी चक्क शेळ्यांना अटक केली.
गेल्या आठवड्यात ही घटना घडली. पोलिसांनी दोन शेळ्यांना आपल्या जीपमध्ये टाकून पोलीस ठाण्यात नेले. शेळ्यांच्या मालकला याबाबतची माहिती समजताच त्याने ठाण्यात धाव घेत, आपल्या शेळ्यांना सोडण्याची विनंती केली. त्यानंतर त्या मालकाला यापुढे असे न करण्याचा इशारा देत, त्याच्या शेळ्या परत देण्यात आल्या.
एका पोलिस कर्मचाऱ्याने आपण शेळ्यांनी मास्क घातला नसल्यामुळेच त्यांना अटक केल्याचे सांगितले. "लोक आजकाल आपल्या कुत्र्यांना आणि पाळीवर प्राण्यांना मास्क घालत आहेत. मग शेळीला का नाही?" असा प्रश्न या कर्मचाऱ्याने उपस्थित केला.
याबाबत अधिक माहिती घेतली असता, अन्वरगंज पोलीस ठाण्याचे सर्कल ऑफिसर सैफुद्दीन बेग यांनी वेगळाच प्रकार सांगितला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शेळ्यांचा मालक मास्क न घालता त्यांना घेऊन जात होता. त्याला हटकले असता, शेळ्यांना तिथेच सोडून त्याने पोबारा केला. त्यानंतर पोलिसांनी शेळ्यांना ताब्यात घेतले, आणि त्यांचा मालक पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याला त्याच्या शेळ्या परत केल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळीला अटक केलेल्या प्रकरणाची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात होती. त्यामुळे बेग यांनी पुढे येत सारवासारव करण्यासाठी वेगळी माहिती दिली. यातले खरे काय आहे हे कदाचित त्या शेळ्यांनाच माहित! मात्र या प्रकरणामुळे सोशल मीडियावर कानपूर पोलीस चांगलेच चर्चेत आले आहे.
हेही वाचा : चुरु जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 25 जणांना कोरोनाची बाधा