श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये पूंछमधून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये बंदुका, दारुगोळा आणि ग्रेनेड्सचा समावेश आहे. २८ डिसेंबरला अटक केलेल्या तीन दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली.
आतापर्यंतची तिसरी कारवाई..
२८ डिसेंबरला बालाकोट परिसरामध्ये तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून सहा हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले होते. त्यानंतर या दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी आतापर्यंत तीन ठिकाणी छापा मारला आहे. या सर्व ठिकाणांवरुन पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.
यापूर्वी बालाकोटच्या डाब्बी गावामध्ये केलेल्या कारवाईत एक पिस्तुल, तीन मॅगझीन, ३५ बुलेट आणि पाच हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले होते. यानंतर आज तिसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली आहे.
धार्मिक तणाव वाढवण्यासाठी करत होते काम..
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी 'जम्मू-काश्मीर घाझनवी फोर्स' या संघटनेचे सदस्य आहेत. ही संघटना केवळ दहशतवादी कृत्यांसोबतच आता धार्मिक स्थळांवरही हल्ले करत आहे. जम्मू-काश्मीर परिसरात धार्मिक तणाव निर्माण करण्याचा या संघटनेचा उद्देश्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सीमेपलीकडून मिळत होती शस्त्रे..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडील दहशतवादी या भागांमध्ये शस्त्रे लपवून ठेवत, आणि या संघटनेचे सदस्य ही शस्त्रे गोळा करत. सोमवारी पकडण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांनी याबाबत सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : गाझियाबादमध्ये राम मंदिरासाठी 2 दिवसात 5 कोटी रुपये जमा